New Parliament Inauguration : पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाला मायावतींचा पाठिंबा, म्हणाल्या “हा विषय आदिवासी महिलेच्या सन्मानाशी..”

लखनौ – दिल्लीतील नव्या संसद भवनाचे येत्या 28 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. या विषयावरून राजकीय वातावरण तापले आहे. उदघाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे अशी विरोधी पक्षांची मागणी आहे व तसे न झाल्यास कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इरादा त्यांनी जाहीर केला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारसाठी मात्र या सगळ्या घटनाक्रमात एक चांगली बातमी आहे. ती म्हणजे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी मात्र पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
केंद्रामध्ये कॉंग्रेस पक्षाचे सरकार असो अथवा आताचे भारतीय जनता पार्टीचे सरकार असो बसपाने नेहमीच पक्षीय राजकारणाच्या वर जात जनहिताच्या मुद्द्यांना प्राधान्य दिले आहे. याच भूमिकेतून आम्ही 28 मे रोजी होणाऱ्या उदघाटनाला पाठिंबा देत आहोत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उदघाटन होत नसल्यामुळे त्यावर टाकला जाणारा बहिष्कार अनुचित आहे. नवे संसद भवन सरकारनेच बनवले असल्यामुळे त्याचे उदघाटन करण्याचा अधिकारही सरकारलाच आहे. हा विषय आदिवासी महिलेच्या सन्मानाशी जोडणे अयोग्य आहे.
राष्ट्रपतीपदासाठी जेंव्हा निवडणूक झाली त्यावेळी विरोधी पक्षांनी हा विचार करायला हवा होता आणि तेंव्हाच मुर्मू यांना बिनविरोध निवडून द्यायला हवे होते. या उदघाटन सोहळ्याचे निमंत्रण मला मिळाले असून त्यामुळे मला आनंद झाला आहे व मी आभार मानते. तथापी, पक्षाच्या आढावा बैठकी आणि पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मी या सोहळ्याला उपस्थित राहू शकत नाही असे मायावती यांनी म्हटले आहे.
मायावती यांनी जरी आता सरकारला शुभेच्छा आणि पाठिंबा दर्शवला असला तरी त्यांनी अगोदर वेगळी भूमिका मांडली होती. जेथे सत्तेचा अहंकार असेल आणि विरोधकांचा सन्मान नसेल ती खरी संसद असू शकत नाही. त्यामुळे त्याच्या उदघाटनाला का जायचे असे त्यांनी म्हटले होते.





