Mayawati : महिला आरक्षणाचे मायावतींकडून स्वागत; SC -ST महिलांसाठी स्वतंत्र कोट्याची मागणी
संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी शनिवारी स्वागत केले.

Mayawati : संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी शनिवारी स्वागत केले. मात्र, अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील महिलांसाठी या आरक्षणात स्वतंत्र तरतूद करण्याची मागणीही त्यांनी केली.
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मायावती म्हणाल्या की, शतकानुशतके शोषण आणि उपेक्षा सहन केलेल्या एससी-एसटी महिलांसाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद केली असती, तर ते ऐतिहासिक पाऊल ठरले असते. केंद्र सरकारने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे आवाहनही त्यांनी (Mayawati) केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या राज्यघटनेतील समतावादी मूल्यांनुसार बसपने नेहमीच महिलांचा सन्मान, सुरक्षा आणि राजकीय प्रतिनिधित्वाचे समर्थन केले आहे. संसद आणि राज्य विधिमंडळांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण तातडीने लागू करण्याची मागणी पक्षाने सातत्याने केल्याचेही त्यांनी नमूद केले.
लोकसभा आणि विधानसभांमधील सदस्यसंख्या ५० टक्क्यांनी वाढवण्याच्या प्रस्तावित विधेयकांबाबत तसेच मतदारसंघ पुनर्रचनेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय हितापेक्षा पक्षीय हिताला प्राधान्य देत असल्याची टीकाही त्यांनी केली.
संसदेचे विशेष अधिवेशन ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मायावतींचे (Mayawati) विधान महत्त्वाचे मानले जात आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महिला आरक्षण लागू करण्यासाठी सरकार घटनादुरुस्तीचा नवा प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे.






