तेराव्याच्या जेवणावरून परतताना उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भीषण अपघात, 12 ठार, अनेक जखमी

हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. तेराव्याच्या कार्यक्रमाचे भोजन करुन परतणाऱ्या मॅक्स गाडीला रोडवेज बसने जोरदार धडक दिली. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये अनेक महिलांचाही समावेश आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हाथरसचे एसपी निपुण अग्रवाल यांनी सांगितले की, आग्रा-अलिगड राष्ट्रीय महामार्गावर बस आणि व्हॅन यांच्यात झालेल्या धडकेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी झाले आहेत.
अनेकांची प्रकृती चिंताजनक –
मिळालेल्या माहितीनुसार, तेराव्याच्या भोजनासाठी लोक मॅक्स लोडरमधून सासनी येथील मुकुंद खेडा येथे गेले होते. अपघातातील जखमी हे खंडौलीजवळील शिवला गावात जात होते. त्यानंतर आग्रा अलीगड बायपास, चांदपा पोलिस स्टेशन हद्दीतील मीताई गावाजवळ रोडवेजच्या बसने वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात 12 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले.
VIDEO | Uttar Pradesh: 12 people were killed after a car collided with a bus on Agra-Aligarh National Highway near Hathras. “The accident took place while one vehicle was trying to overtake another vehicle. Till now, 12 people have lost their lives, while 16 others are injured,”… pic.twitter.com/9dKyCkghVR
— Press Trust of India (@PTI_News) September 6, 2024
पोलिसांनी जखमींना मदत करून रुग्णालयात दाखल केले –
घटनास्थळावरून जे व्हिडीओ समोर आले आहेत ते अतिशय वेदनादायक आहेत. जखमींमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस पीडितांना सर्वतोपरी मदत करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. जखमींना हॉस्पिटलपर्यंत मदत करताना पोलिस दिसत होते. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. बसमधील प्रवासीही जखमी झाले की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.





