ZP Election Result : मावळमधून भाजप हद्दपार? अजित पवारांच्या पठ्ठ्याने रचला इतिहास; 25 वर्षांच्या सत्तेला लावला सुरुंग
ZP Election Result : मावळ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) भाजपचा पूर्णपणे सुपडासाफ केला आहे.

ZP Election Result : मावळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने घवघवीत यश मिळवले आहे. मावळ जिल्हा परिषदेच्या सर्व ५ जागा आणि पंचायत समितीच्या सर्व १० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवत पूर्ण वर्चस्व सिद्ध केले आहे.
भाजपने मावळमध्ये सर्व १५ जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र एकाही जागेवर विजय मिळवता न आल्याने पक्षाचा पूर्णपणे सुपडासाफ झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. “मावळमधून भाजप हद्दपार झाला,” अशी प्रतिक्रिया आता स्थानिक स्तरावर ऐकू येत आहे.
एकेकाळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी “पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला हद्दपार करू,” असे वक्तव्य केले होते. मात्र मावळमधील या दारुण पराभवानंतर भाजपच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून “भाजपच संपतोय की काय?” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, या दणदणीत यशासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी मावळमधील आपले राजकीय बळ पुन्हा एकदा दाखवून दिले. मात्र विजयाचा आनंद साजरा करताना अजित पवार यांची उणीव प्रकर्षाने जाणवली आणि याच कारणामुळे सुनील शेळके भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
निकालानंतर प्रतिक्रिया देताना सुनील शेळके म्हणाले, “अजितदादा असते तर आज आम्ही जल्लोष साजरा केला असता. इतक्या कठीण परिस्थितीतही मावळच्या मायबाप जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास ठेवला. अजित पवार यांनी मावळच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी दिला, अनेक कामांची सुरुवात झाली.
आजचा हा निकाल म्हणजे जनतेकडून अजित पवार यांच्या कार्याची पावती आहे.” यावेळी अजितदादांचा विषय निघताच सुनील शेळके यांचे डोळे पाणावले. या निकालामुळे मावळच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे चित्र स्पष्ट झाले असून अजित पवार यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त झाल्याचे बोलले जात आहे.





