Maval News: पाण्यासाठी दोन तासांची पायपीट; महागाव ग्रामपंचायतीला ग्रामस्थांचे टाळे ठोको आंदोलन
धालेवाडी-मालेवाडीत पाणीटंचाई तीव्र; लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

पवनानगर – मावळ तालुक्यातील महागाव ग्रामपंचायत हद्दीतील धालेवाडी आणि मालेवाडी परिसरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना तब्बल दोन तास पायपीट करावी लागत असून, काही ठिकाणी छोट्या डबक्यांमधून पाणी आणण्याची वेळ आली आहे.
जलजीवन योजनेतील कथित अनियमितता, रखडलेली कामे आणि विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी सोमवारी (दि. १६) महागाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर टाळे ठोको आंदोलन केले.
महागाव ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत ग्रामस्थांनी यापूर्वीही विविध तक्रारी केल्या होत्या. धालेवाडी आणि मालेवाडीतील पाणीपुरवठ्याची समस्या, जलजीवन योजनेची अपूर्ण कामे आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजातील कथित अनियमिततेबाबत सुमारे पंधरा दिवसांपूर्वी लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यावर अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे गणेश साबळे यांच्यासह ग्रामस्थांनी एकत्र येत आंदोलन केले.
गावातील पाणीपुरवठ्याच्या अनेक पाइपलाइन तुटलेल्या असून, त्यांची अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. जलजीवन योजनेची पाइपलाइन ताब्यात घेण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
पाणीपुरवठा होत नसतानाही नागरिकांकडून सुमारे दोन हजार रुपये पाणीपट्टी आकारून वसूल केली जात असल्याचा मुद्दा आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. याशिवाय आवश्यक कागदपत्रे मिळवितानाही अडवणूक होत असल्याची तक्रार करण्यात आली.
यावेळी मालेवाडीतील पाणीपुरवठा खंडित होण्यामागे विद्युत रोहित्र चोरीला गेल्याचे कारण ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी उत्तरात नमूद केले आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला असून, नवीन रोहित्र बसविण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. रोहित्र बसविल्यानंतर दोन दिवसांत मालेवाडीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले.
धालेवाडीतील जलजीवन योजनेचे काम प्रगतीपथावर आणण्यात येईल. तसेच ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पुढील पंधरा दिवसांत मालेवाडी येथे ग्रामसभा आयोजित करण्यात येईल, असे ग्रामसेवक एल. एस. साळवे यांनी लेखी निवेदनाद्वारे ग्रामस्थांना सांगितले. ग्रामसभेत सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून अडचणींवर मार्ग काढण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
आंदोलनस्थळी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मध्यस्थी केली. पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण, पोलीस कर्मचारी प्रशांत तुरे, मनोज मोरे आणि भीमराव वाळुंज यांनी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात चर्चा घडवून आणली. त्यानंतर लेखी आश्वासन मिळाल्याने ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी
जलजीवन योजनेचे काम योग्य पद्धतीने पूर्ण होण्यापूर्वीच ते ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ही योजना ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी गणेश साबळे यांनी केली.
ग्रामपंचायतीने लेखी आश्वासन दिले असले, तरी केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झाला पाहिजे, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. येत्या दोन दिवसांत मालेवाडीचा पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही आणि धालेवाडीतील पाणीप्रश्नावर ठोस कार्यवाही झाली नाही, तर ग्रामपंचायतीविरोधात अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
Satara: मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना शेतकर्यांसाठी फायदेशीर





