Maval News: डॉ. डी. वाय. पाटील कॅम्पसमध्ये दीक्षांत सोहळा संपन्न; ३५० हून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव

प्रभात वृत्तसेवा
वडगाव मावळ – वराळे (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, वराळे येथे नुकताच एक भव्य दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. शिरबहादुरकर, डॉ. वाय. बी. गुरव (शैक्षणिक अधिष्ठाता) तसेच अनुदीप फाऊंडेशनचे प्रतिनिधी मान्यवर म्हणून उपस्थित होते.
या दीक्षांत समारंभात अनुदीप फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या आय.टी.पी.आर. कोर्स (कोर जावा) यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या ३५० हून अधिक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी शिक्षण पुरेसे नसून, त्यासोबतच अद्ययावत तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे.
ही गरज ओळखून महाविद्यालयाने अनुदीप फाऊंडेशनच्या सहकार्याने हा विशेष कौशल्यविकास उपक्रम राबविला. या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आधुनिक ज्ञान तसेच व्यावसायिक कौशल्यांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत,
अशा प्रकारचे कौशल्याधारित उपक्रम विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत निश्चितच वाढ घडवून आणतात, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व प्रभावी सूत्रसंचालन प्रा. आशिष जावके ( ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट ऑफिसर ) यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुशांत पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी अॅड. अनुजा पाटील यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे हा दीक्षांत समारंभ यशस्वीरीत्या पार पडला.





