प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निर्णायक टप्प्यावर आल्या आहेत. मावळ तालुक्यातील वडगाव, लोणावळा आणि तळेगाव दाभाडे या शहरांमध्ये विविध प्रभागांत मतदान होत आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना, राजकीय आरोप – प्रत्यारोपांना आणि प्रचारयुद्धाला आज मतदारांचा अंतिम कौल मिळणार आहे. तीनही शहरांतील परिस्थिती वेगवेगळी असली तरी सर्वत्र चुरशीच्या लढतींचे वातावरण आहे. वडगाव नगरपंचायतीत १७ पैकी १४ प्रभागांमध्ये भावकी-भावकीचे राजकारण ठळकपणे जाणवत आहे. त्याप्रमाणे प्रत्येक प्रभागात काटे की टक्कर होणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील दोन प्रमुख घराण्यांमध्ये यावेळी थेट संघर्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पत्नी अबोली ढोरे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे भाजपने माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांच्या कन्या ऍड. मृणाल म्हाळसकर यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना प्रमुख चेहरा बनवले आहे. या दोन्ही कुटुंबांचा वडगावच्या राजकारणावर दशकांपासून प्रभाव असल्याने शहरातील मतदार या लढतीकडे विशेष उत्सुकतेने पाहत आहे.याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या वैशाली उदागे आणि अपक्ष उमेदवार शेख नाजमाबी अल्ताफ या उमेदवारांचाही या निवडणुकीतील महत्त्वाचा सहभाग आहे. खोपोलीत राजकीय तापमान शिगेला खोपोलीत यंदाची निवडणूक विशेष तापलेली आहे. प्रचारादरम्यान प्रचंड आरोप-प्रत्यारोप, राजकीय रॅली, घरोघरी संपर्क आणि सोशल मीडियावरील प्रचारामुळे वातावरण तापले. शिवसेना (शिंदे गट) – भाजप – आरपीआय या महायुतीविरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट) – शिवसेना (ठाकरे गट) – शेकाप परिवर्तन विकास आघाडी या दोन मोठ्या गटांत लढत विभागली गेली आहे. नगराध्यक्षपदासाठी एकूण सात उमेदवार रिंगणात असून मुख्य स्पर्धा शिवसेना शिंदे गट, भाजप, आरपीआय महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे आणि अजित पवार गट राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेना आणि शेकाप परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार डॉ. सुनील पाटील या दोघांत आहे. निवडणुकीपूर्वीच्या सभांमध्ये, प्रचार यात्रांमध्ये आणि पदयात्रांमध्ये दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. शहरातील विकासकामांपासून ते भ्रष्टाचाराच्या आरोपांपर्यंत विविध मुद्द्यांवर प्रखर शब्दयुद्ध झाले. नगरसेवक पदांसाठी ३१ जागांसाठी ११८ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणातील उमेदवारीमुळे खोपोलीतील प्रभागनिहाय समीकरण अत्यंत गुंतागुंतीचे बनले आहे. निकाल कोणाच्या बाजूने? आजचा दिवस मावळ तालुक्याच्या तीन प्रमुख शहरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. वडगावात घराणेशाहीची तीव्र लढत, तळेगावात आंशिक मतदान असूनही नगराध्यक्षपदाची प्रतिष्ठेची स्पर्धा, तर खोपोलीत दोन मोठ्या गटांतील तापलेला संघर्ष या तिन्ही परिस्थितींमुळे निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मतदानाची टक्केवारी जास्त राहिल्यास लढतींचा कल बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.