Maval Crime : नात्याला काळिमा! संशयाच्या भोवऱ्यात साडूनेच घेतला साडूचा जीव ; आरोपी ३ तासांत गजाआड

प्रभात वृत्तसेवा
वडगाव मावळ – मेहुणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून साडूनेच साडूचा खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १०) रात्री मुंढावरे येथील इंद्रायणी नदीवरील पुलाजवळ घडली. या घटनेत महेश अंभोरे (वय ३५) यांचा खून झाला असून, गुरुनाथ पाटील (वय ३२) या त्याचाच साडूने खून केल्याचे उघड झाले आहे. घटनेनंतर फरार झालेल्या गुरुनाथ पाटीलला लोणावळा पोलिसांनी अवघ्या तीन तासांत कोल्हापूर येथून अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महेश अंभोरे यांचे लग्न मे २०२५ मध्ये झाले होते. लग्नानंतर त्यांच्या पत्नीचा बहिणीच्या नवऱ्याशी म्हणजेच गुरुनाथ पाटील याच्याशी जवळीक वाढल्याच्या संशयावरून दोघांमध्ये वाद सुरू होते. शुक्रवारी रात्री पुन्हा वाद चिघळल्याने गुरुनाथ पाटीलने महेश अंभोरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत हत्या केली.
घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी तपास केला असता कोल्हापूर परिसरात तो लपल्याची माहिती मिळाली. सापळा रचून अवघ्या तीन तासांत त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, लोणावळा शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.





