लावूनी मृदंग श्रृती टाळ घोष । सेवू ब्रह्मरस आवडीने

पिंपरी –
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम ।
आणिकांचे काम नाही आता ।।
मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर ।
केला राज्यभार चाले ऐसा ।।
लावूनी मृदंग श्रृती टाळ घोष ।
सेवू ब्रह्मरस आवडीने ।।….
आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांचा मेळा ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करत आणि टाळ, मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे बुधवार (दि. 22) रोजी पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत आगमन झाल्यानंतर शहराच्या वतीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंड्यांचे महापालिकेच्या वतीने सन्मान करण्यात आला. या वेळी दिंडी प्रमुखांना पुष्पहार आणि श्रीफळ देऊन स्वागत करून त्यांना वैद्यकीय उपचारासाठी प्रथमोपचार पेटी, महापालिका प्रशासन आणि त्यांचे संपर्क क्रमांक असलेली माहिती पुस्तिका, मूल्यशिक्षण अभ्यास पुस्तिका दिंडी प्रमुखांना भेट देण्यात आली.
दिघी मॅगझिन चौक येथे झालेल्या पालखी सोहळ्याच्या स्वागतावेळी पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सह शहर अभियंता संदेश चव्हाण, उप आयुक्त विठ्ठल जोशी, सचिन ढोले, रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता किशोर महाजन, माणिक चव्हाण, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, बाळासाहेब खांडेकर, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, स्वाती मुळे, राजू महाराज ढोरे, डॉ. मृदुला महाजन आदी उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने स्वच्छाग्रह मोहीम सुरू असून प्लास्टिकमुक्त वारीची संकल्पना देखील राबवली जात आहे. त्यादृष्टीने माहिती देण्यासाठी महापालिकेने चित्ररथ तयार केला आहे. या रथाद्वारे स्वच्छतेविषयक जनजागृती केली जात आहे. 360 अंशात गोलाकार फिरणारा सेल्फी पॉइंट महापालिकेने मॅगेझिन चौकात उभारला होता. मी स्वच्छाग्रही, प्लॅस्टिक वापरणार नाही, स्वच्छता मोहिमेत सहभाग घेईल, मी परिसर स्वच्छ ठेवेल असे विविध संदेश या सेल्फी पॉइंटद्वारे देण्यात आले.
दरम्यान, दिघी मॅगझिन चौक या ठिकाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पालखीचे चित्र डोळ्यांसमोर उभे करणारे सुंदर शिल्प उभारण्यात आले आहे. या शिल्पाचे उद्घाटन आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. डोक्यावर टोपी आणि खांद्यावर पालखी आणि विणेकरी, टाळ-मृदंग वादकांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहे. विसाव्याच्या ठिकाणी तसेच पालखी मार्गावर महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा शहरातून पुण्याच्या दिशेने
मार्गस्थ झाला.




