Jejuri News : माऊलींचा पालखी सोहळा आज जेजुरी मुक्कामी; वारकऱ्यांची सकाळपासूनच गडावर दर्शनासाठी रीघ

जेजुरी : आज संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सासवडहून मल्हारनगरीत अर्थात जेजुरीत मुक्कामी येणार आहे. यामुळे सकाळपासूनच जेजुरीत वारकरी यायला सुरूवात झाली आहे. खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी गडावर येत आहेत. यामुळे दर्शनासाठी वारकऱ्यांची रीघ पाहायला मिळत आहे. सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जेजुरीनगरीत दाखल होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयार करण्यात आली आहे.
गडावर भक्तीमय वातावरण
पालखी सोहळा जेजुरीत मुक्कामी येणार असल्याने जेजुरीत सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. रस्त्यावरून लाखोंच्या संख्येने वारकरी माऊली माऊलीच्या जयघोषात चालत आहेत. जेजुरी गडावर या दिवसाचे औचित्य साधत खंडोबा देवाच्या गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
मंदिर परिसरात विठ्ठलाची लक्षवेधक प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांसाठी ही प्रतिकृती आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. मंदिर परिसरात माऊलींच्या जयघोषात येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष वारकरी करत भंडाऱ्यांची मुक्त उधळण करत आहेत. सकाळपासून जेजुरीत पावसांच्या सरी देखील बरसत आहेत.
भंडाऱ्याची उधळण
माऊलींचा पालखी सोहळा जेजुरीत आल्यानंतर रथावर पवित्र भंडाऱ्यांची उधळण करण्यात येणार आहे. हा प्रसंग पाहणे म्हणजे याचि देही याची डोळा असा असणार आहे.





