Pimpri | माऊली… माऊलीचा जयघोष

आळंदी,
धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार । धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥
धन्य भागिरथी मनकर्णिका वोघा । आणिक हो गंगा त्रिवेणी त्या ॥
धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग । मिळाले ते सांग आळंकापुरीं ॥
नामा म्हणे धन्य भाग्याचे हे संत । जाला पहा एकांत ज्ञानोबाचा ॥
माऊली… माऊली… माऊलीचा जयघोष, आकर्षक फुलांनी सजविलेला रथ, त्यामध्ये विराजमान माऊलींचा चांदीचा मुखवटा म्हणजे साक्षात माऊलीच.. हा सुखसोहळा डोळ्यामध्ये साठविण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले भाविक असा वैभवी रथोत्सव द्वादशीला बुधवारी (दि. 10) सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. वैभवी रथोत्सवाने उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 728व्या संजीवन समाधी सोहळा दिनानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेण्यासाठी नगरप्रदक्षिणा मार्गावर गर्दी केली होती. गुरुवारी (दि. 28) माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे.
सायंकाळी साडेचारच्या सुमारास परंपरेनुसार इनामदार कुटुंबीयांच्या वतीने माउलींची विधिवत पूजा करून माउलींचा चांदीचा मुखवटा नगरप्रदक्षिणेसाठी सजविलेल्या रथात विराजमान करण्यात आला. विविध रंगीबेरंगी आकर्षक वस्त्रालंकारांनी सजविलेले श्रींचे रूप भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. टाळ- मृदंगांचा निनाद आणि माउली-तुकोबांच्या जयघोषात रथोत्सव मिरवणूक चाकण चौक, भैरवनाथ चौकमार्गे हजेरी मारुतीपासून मुख्य मंदिराकडे मार्गस्थ झाली.
तत्पूर्वी पहाटे 2 ते 3:30 पवमान अभिषेक व दुधारती झाली पहाटे 3:30 ते 4 खेडचे प्रांतअधिकारी अनिल दौंडे यांच्या हस्ते पंचोपचार पूजा झाली. पहाटे 3 ते 6 मुक्ताई मंडपात नांदेडकर मंडळींची दिंडी क्र.15 यांचेतर्फे काकडा भजन सेवा. सकाळी 5 ते 11:30 श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी 12 ते 12.30 महानैवेद्य आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 श्री माऊलींचा भव्य रथोत्सव संपन्न झाला. दुपारी 4 ते 6 वीणा मंडपात ह. भ. प. हरिभाऊ बडवे यांच्या तर्फे कीर्तन सेवा झाली. साडेआठ ते नऊ धुपारती, रात्री 9 ते 11 वीणा मंडपात ह भ प केंदूरकर महाराज यांच्या तर्फे कीर्तन सेवा. रात्री 11 ते 12 पास धारक, खिरापत पूजा, प्रसाद वाटप- वीणा मंडप, श्रींच्या गाभाऱ्यात फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आला.
अनेक भाविक परतीच्या वाटेवर –
कार्तिकी एकादशीला (दि. 26) तीर्थक्षेत्र आळंदीत तीन लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले होते. एकादशीच्या दिवशी दिवसभर आळंदीतील सर्वच रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. रात्री कीर्तन, हरिजागर करून सकाळी द्वादशीचे भोजन करून अनेक भाविक गावी परतले. खरेतर श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांचा संजीवन समाधी सोहळा हा प्रमुख सोहळा आहे; मात्र बहुतांश भाविक द्वादशीलाच गावी परतात. तर वारकरी फड परंपरेचे भाविक वारकरी, सप्ताहसाठी आलेले वारकरी, दिंडी घेऊन आलेले हे समाधी सोहळा झाल्यानंतर तर काहीजण समाधी सोहळ्याच्या दुसर्या दिवशी काला करून परततात.
आज समाधी सोहळ्यानिमित्त होणारे कार्यक्रम –
कार्तिक वद्य त्रयोदशी वार गुरूवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 ते 4 पवमान अभिषेक व दुधारती, सकाळी 5 ते 9: 30 श्रींच्या चलपदुकांवर भाविकांच्या महापूजा, सकाळी 7ते 9 हैबतबाबा पायरी पुढे ह भ प हैबतबाबा आरफळकर यांचे तर्फे कीर्तन, सकाळी 7 ते 9 विणा मंडपामध्ये कीर्तन, सकाळी 7 ते 9 भोजलींग काका मंडप येथे दाणेवाले निकम दिंडी यांचे कीर्तन, नऊ ते अकरा भोजलिंग काका मंडप येथे दाणेवाले निकम दिंडीतर्फे कीर्तन सेवा, सकाळी 9 ते 12 ह भ प नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन, दुपारी 12 ते 12:30, 728 वा संजीवन समाधी दिनानिमित्ताने घंटा नाद ,पुष्पवृष्टी व आरती मान्यवरांना नारळ प्रसाद, दुपारी 12:30 ते 1 महानैवेद्य, सायंकाळी 6:30 ते 8:30 विणा मंडपात ह भ प सोपान काका देहूकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा, रात्री 9 ते 11.30 श्रींची गुरुवार पालखी, 11.30 ते 12 धुपारती, रात्री 9:30 ते 11:30 कारंजा मंडपा मध्ये हरिभाऊ बागडे व पंढरी केसरकर यांचेतर्फे भजन, रात्री 12 ते 4 हैबतरावबाबा आरफळकर यांचेतर्फे जागर.





