Matrimonial Fraud : लग्नाचे आमिष पडले महागात! ‘इस्रो’चा शास्त्रज्ञ असल्याचे भासवून महिलेला २७ लाखांचा गंडा
Matrimonial Fraud : जीवनसाथी डॉट कॉमवर विश्वास बसला आणि घात झाला! लग्नाचे आमिष दाखवून ४२ लाखांची लूट करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू.

Matrimonial Fraud – विवाह संकेतस्थळावर खोटे प्रोफाइल तयार करून एका महिलेकडून ४२ लाख ६४ हजार ३२ रुपये घेतले. सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार केल्यावर महिलेला काही रक्कम परत मिळाली. मात्र चोरट्याने २७ लाखांची फसवणूक केली. ही घटना ताथवडे येथे २७ नोव्हेंबर २०२४ ते ३० जानेवारी २०२५ रोजी घडली. आदर्श प्रशांत म्हात्रे ऊर्फ जयेश पाटील (वय ३६, रा. अलिबाग रायगड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत सिल्व्हर टिवीन डेक्स सोसायटी, ताथवडे येथे राहणा-या पिडित महिलेने शनिवारी (दि. २८) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने खोट्या नावाने जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर आपली नाव नोंदणी केली होती. त्याने पिडित महिलेशी ऑनलाइन संपर्क करून आपण स्वतः इस्रोमध्ये वैज्ञानिक असल्याचे भासवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.
तसेच पिडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून टप्प्याटप्प्याने तिच्याकडून वेगवेगळी कारणे सांगत ४२ लाख ६४ हजार ३२ रूपये घेतले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या महिलेने सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार केली. त्यामुळे आरोपीने उकळलेली १६ लाख ६४ हजार ३२ रुपयांची रक्कम तिला परत मिळाली. मात्र आरोपीने २७ लाख रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.





