Matheran News : माथेरानकडे पर्यटकांची पाठ! अपुऱ्या सुविधांमुळे पर्यटकांचा ओघ मंदावला

प्रभात वृत्तसेवा
माथेरान – एकेकाळी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पंधरा दिवस पर्यटकांच्या गर्दीने गजबजणारा माथेरान परिसर यावर्षी मात्र ओसाड झाला आहे. लक्ष्मीपूजनानंतर भाऊबीजेचा दुसरा दिवस उजाडूनही माथेरानमध्ये अपेक्षित पर्यटकांचा ओघ दिसला नाही. केवळ तीन ते चार दिवसांचा किरकोळ सीझन झाल्याने हॉटेल, लॉजिंग, खानावळ, दुकाने, घोडेवाले आणि हातगाडीवाले यांच्या उत्पन्नावर गदा आली आहे. या घसरणीचा थेट परिणाम माथेरानच्या संपूर्ण अर्थचक्रावर झाला असून स्थानिक व्यापारी वर्गात तीव्र निराशा पसरली आहे.
दिवाळीपूर्वी स्थानिक व्यवसायिकांनी मोठ्या तयारीने स्वागताची आखणी केली होती. हॉटेल्सची रंगरंगोटी, दुकानदारांची सजावट, खाद्यपदार्थांची तयारी उत्साहात झाली होती. पण अपेक्षित गर्दी न आल्याने सर्व व्यवस्था वाया गेली. अनेक लॉजिंग-हॉटेल्स रिकामी आहेत. काही हॉटेल चालकांनी सांगितले की, पर्यटक रूमसाठी चौकशीसुद्धा आले नाहीत. आणि ड्या काही पर्यटकांनी भेटी दिल्या ते पर्यटक मुख्यतः मुंबई, पनवेल किंवा कर्जत परिसरातील स्थानिक आहेत. त्यामुळे या वर्षी सीझन सुरूच झालेला नाही, अशी प्रतिक्रिया अनेक व्यापाऱ्यांनी दिली.
स्थानिक व्यवसायिकांच्या म्हणण्यानुसार, माथेरानमध्ये मूलभूत सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत. घाट मार्गावरील वाहतूक व्यवस्थापन ढिसाळ आहे. दस्तुरी नाक्यावर पार्किंगची जागा मर्यादित असून पर्यटकांसाठी स्वागत व्यवस्था शिस्तबद्ध नाही. त्यामुळेच एकदा त्रास सहन केलेल्या पर्यटकांनी माथेरानकडे पाठ फिरवली आहे. अल्पकालीन फायद्याच्या मोहात काही व्यवसायिकांनी पर्यटकांकडून अवाजवी दर आकारून, खोटी आश्वासने देऊन आणि दिशाभूल करून दीर्घकालीन नुकसान ओढवून घेतले आहे. एक सीझन कमावला पण पुढचं भविष्य अंधारात ढकलले असल्याचे स्थानिक सांगतात.
गर्दीचा नकारात्मक परिणाम..
मागील मान्सून सीझनमध्ये माथेरानमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. परंतु त्या गर्दीने पर्यटकांचा अनुभव कटू केला. घाटामध्ये झालेली वाहतूक कोंडी, पार्किंगची तीव्र कमतरता, काही ठिकाणी झालेली फसवणूक आणि लुटमार या प्रकारांनी माथेरानची प्रतिमा डागाळली आहे. अनेक पर्यटकांनी माथेरानला पुन्हा येणार नाही अशी प्रतिक्रिया सामाजिक माध्यमांवर नोंदवली होती.
माथेरानचा भविष्यकाळ धोक्यात..
पर्यटन म्हणजे माथेरानची जीवनधारा आहे. शहराचे संपूर्ण अर्थचक्र पर्यटकांवर अवलंबून आहे. त्यामुळे सीझनमधील पर्यटकांचा हा घटता आलेख केवळ स्थानिक व्यवसायिकांनाच नव्हे, तर संपूर्ण माथेरानच्या अस्तित्वालाच आव्हान देणारा ठरू शकतो. शासन, प्रशासन आणि स्थानिकांनी एकत्रित येऊन माथेरानच्या पर्यटन व्यवस्थेचे पुनर्रचना करणे हाच सध्याच्या संकटातून बाहेर पडण्याचा एकमेव उपाय आहे.
“दरवर्षी लक्ष्मीपूजनानंतर चार ते पाच दिवसमाथेरानमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत असते, त्यामुळे आम्ही पुर्ण तयारी आधीच करून ठेवली होती, परंतू यंदा पर्यटक आलेच नाहीत. त्यामुळे आमचे आर्थिक गणित पुर्णपणे कोलमडले आहे.”
– रवी कदम, स्थानिक व्यावसायिक
“जून महिन्यात आम्ही याठिकाणी आलो होतो, परंतू पावसाळी वातावरणातच पर्यटकांचा ओघ वाढल्यामुळे घाटात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. ही वाहतूक कोंडी पाहता वाटले होते की प्रशासनाने काहीतरी व्यवस्था करून हा प्रश्न मार्गी लावला असेल, परंतु ही परिस्थिती अजूनही सुधारली नाही, त्यामुळे माथेरानकरांसोबतच पर्यटकांसाठी देखील ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल.”
-शंतनू कर्णिक, पर्यटक





