प्रभात वृत्तसेवा माथेरान – नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जाहीर होताच माथेरानमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. काही नेते प्रभागनिहाय मतदारांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी घराघरात भेटी देत असून, तुमच्या घरातील एका व्यक्तीला सभागृहात स्वीकृत सदस्य म्हणून पाठवू, अशी आश्वासने देत मतदारांना भुलविण्याचा प्रयत्न करत आहेत.मात्र मागील निवडणुकांतील अनुभव लक्षात घेऊन यावेळी मतदार सजग झाले आहेत. अशा खोट्या आश्वासनांमुळे पूर्वी फसवणूक झालेल्या नागरिकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. विकासासाठी नव्हे, तर वैयक्तिक फायद्यासाठी काही जण राजकारण करत असल्याचेही स्थानिक मतदारांकडून बोलले जात आहे.पूर्वी काहींनी पक्षप्रमुखांना आर्थिक आमिषे देऊन किंवा जवळीक साधून स्वीकृत पदे मिळवली, तरी त्यांनी शहराच्या विकासासाठी कोणतेही ठोस योगदान दिले नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या वेळेला मतदारांनी ठरवले आहे की, भेटवस्तू किंवा आमिषांवर विश्वास न ठेवता, काम करणाऱ्या आणि प्रामाणिक उमेदवारालाच मत देण्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.