गणितज्ञ शकुंतलादेवी यांच्या विक्रमाची गिनिज बुकात नोंद

नवी दिल्ली – देशातल्या थोर गणितज्ञ आणि वेगाने आकडेमोड करण्यासाठी प्रसिद्द असलेल्या दिवंगत शकुंतलादेवी यांना आज त्यांनी चाळीस वर्षापूर्वी लंडनमध्ये केलेल्या विश्वविक्रमासाठीच गिनिज बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. नवी दिल्लात झालेल्या या कार्यक्रमात त्यांची कन्या अनुपमा बॅनर्जी यांनी हे प्रमाणपत्र स्विकारले.
18 जुन 1980 या दिवशी लंडनमधील इंपिरीयल कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान शकुंतला देवी यांनी 13 आकडी दोन संख्यांचा गुणाकार केवळ 28 सेकंदांमध्ये केला होता.
“जेव्हा आईने हा विश्वविक्रम केला तेव्हा आपण केवळ दहा वर्षांची होते.
मी जिथे गेले तिथे सर्व लोक त्या रेकॉर्डबद्दलच बोलत होते. म्हणून मला हे माहित होते की ती जगभरातील एक मोठी कामगिरी होती. लंडनमधील कवेंट्री स्ट्रीटवरच्या ट्रोकॅडेरो सेंटरमध्ये एका दालनात शकुंतला देवींचे मोठे छायाचित्र लावले आहे. ते पाहताना अंगावर रोमांचे उभे राहतात.’ असे बॅनर्जी म्हणाल्या.
त्यांच्या जीवनावर येत असलेल्या चित्रपटाच्या प्रर्दशनाच्या आधल्याच दिवशी हा कार्यक्रम झाला. अनु मेनन दिग्दर्शित या चित्रपटात विद्या बालन मुख्य भूमिकेत आहे.





