पुणे जिल्हा | एखतपूर-मुंजवडीमध्ये मातृ-पितृ छाया वन

बेलसर, (वार्ताहर) – एखतपूर-मुंजवडी (ता. पुरंदर) ग्रामपंचायत सध्या अभिनव व समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. ग्रामपंचायत स्वनिधीतून प्लॅस्टिक मुक्त गाव व मनरेगाच्या माध्यमातून मातृ-पितृ छाया वन यासारख्या उपक्रमांची अलबजावणी करत आहे.
प्लॅस्टिकमुक्त गाव या उपक्रमात जनजागृती बरोबर प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र पिशव्या देण्यात आल्या असून ग्रामस्थांनी प्लॅस्टिकची वेस्टने, टाकाऊ वापरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आदींची एकत्र विल्हेवाट करावयाची आहे.
प्लॅस्टिकच्या वापराबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू असून यापूर्वीच सुरू केलेल्या घंटागाडीची मदत होत आहे. मातृ पितृ छाया वन हा महत्त्वकांक्षी उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत इच्छाशक्ती पणाला लावत आहेत.
आंबा, चिकू, पेरू, फणस, पल बोर सफरचंद आवळा इत्यादी फळझाडांच्या जाती तसेच लिंब, करंज, बाभूळ, आंबा, वटवृक्ष, पिंपळ ,बांबू यासारख्या स्थानिक जातीही ग्रामपंचायतने खरेदी केल्या असून मोकळ्या, माळरान जमिनीवर त्यांची लागवड केली आहे.
उद्योजक पोपट कुंभार यांच्या सहकार्याने जेसीबीने खड्डे घेऊन, खते वापरून टँकरने पाणी घालण्याची जबाबदारीची तरतूद केली आहे.
आपल्या माता- पित्याच्या सन्मानार्थ झाड लावा व जगवा असे आवाहन केले आहे. शवशंभो विद्यालय या शाळेनेही या उपक्रमाचे स्वागत केले असून पहिल्या टप्प्यात सर्व शिक्षक व 100 विद्यार्थ्यांनी 100 पेक्षा अधिक झाडे लावली व पाणीही घातले.
यावेळी सरपंच शीतल टिळेकर, उपसरपंच सागर कुंभार, ग्रामपंचायत सदस्य तुषार झुरंगे, विद्या झुरंगे, ग्रामविकास समिती प्रमुख हनुमंत झुरंगे, जनार्दन मोरे, मुरलीधर झुरंगे, दत्तात्रय अडसूळ, शिवाजी झुरंगे,मच्छिंद्र झुरंगे, मुख्याध्यापक भगवंत बेंद्रे, प्रवीण जगदाळे, सायली झुरंगे, दत्तात्रय झुरंगे, अक्षय धिवार, ग्रामसेवक अनिल जगताप आदींनी सहभाग घेतला.



