पिंपरी | उद्या मतदान केंद्रांवर साहित्य पोहोचणार

पिंपरी, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभेची मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी रविवारी (दि. १२) विधानसभा मतदारसंघनिहाय पोलीस बंदोबस्तात मतदान साहित्य वितरण करण्यात येणार आहे. सर्व विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांवर निवडणूक साहित्य सुरक्षितरित्या पोहोच करुन सुरक्षित परत आणावे, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिले.
मावळ लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण २५ लाख ८५ हजार १८ मतदार असून २ हजार ५६६ मतदान केंद्रे आहेत. यासाठी ९ हजार २३६ बॅलेट युनिट, ३ हजार ५९१ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ८१६ व्हीव्हीपॅट यंत्रे लागणार आहेत.
पनवेल विधानसभेतील ५४४ मतदान केंद्रांवर मतदान साहित्याचे वितरण ए.आर कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेज येथून होणार आहे. कर्जत विधानसभेतील ३३९ मतदान केंद्रांवर मतदान साहित्याचे वितरण पोलिस ग्राउंड येथून करण्यात येणार आहे.
उरण विधानसभेतील ३४४ मतदान केंद्रांवर आवश्यक मतदान साहित्याचे वितरण डी. बी पाटील मंगल कार्यालयातून होणार आहे. मावळ विधानसभेतील ३९० मतदान केंद्रांवर मतदान साहित्य नूतन इंजिनीअरिंग कॉलेज येथून वितरण होईल.
चिंचवड विधानसभेतील ५४९ केंद्रांवर मतदान साहित्याचे वितरण शंकर आण्णा गावडे कामगार भवनातून करण्यात येणार आहे. पिंपरी विधानसभेतील ४०० मतदान केंद्रांवर ऑटो क्लस्टर ॲण्ड रिसर्च सेंटर येथून मतदान साहित्य वितरित केले जाणार आहे.
रविवारी (दि. १२) सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्य वितरणाला सुरुवात होईल. क्षेत्रीय (सेक्टर) अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायक यांना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत तसेच साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहीत नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना काय काळजी घ्यावी, याबाबत माहिती दिली जाईल.
मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष आणि सहायक मतदान केंद्राध्यक्षांकडे ईव्हीएम म्हणजेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, आवश्यक साहित्य तसेच मतदान प्रक्रियेविषयीचे विविध पाकीटे आणि लिफाफे आदी साहित्य सुपूर्द करण्यात येतील. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य जमा करून घेतले जाणार आहे. निवडणूक साहित्य वाटप व स्वीकृतीसाठी स्वतंत्र कर्मचारी तसेच नियंत्रण पथक नियुक्त करण्यात आले आहे.
प्रत्येक वाहनाला जीपीएस प्रणाली बसवणार
मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर नेमून दिलेल्या ६ विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी एका बोटीसह १७५ पीएमपीएमल बसेस, २१९ एसटी महामंडळाच्या बसेस, १०५ मिनी बसेस, २५ ईव्हीएम कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे.
साहित्य घेवून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून जीपीएस प्रणालीदेखील बसवली जाणार आहे. प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करणेकामी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने आवश्यक कार्यवाही करावी, नियोजित मतदान केंद्रांवर आवश्यक मतदान साहित्य वितरण करताना योग्य समन्वय ठेवून मतदान साहित्य संबंधित मतदान केंद्रांवर सुस्थितीत पोहोचेल याची दक्षता घ्यावी.
निवडणूक मतदान कामकाजासाठी नेमणूक करण्यात आलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारीने काम पार पाडावे, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिले आहेत.





