मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात भव्य ‘जनआक्रोश आंदोलन’

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील अनेक वर्षांपासून आंदोलने सुरु आहेत. त्यातच आता उद्या जालन्यात भव्य आंदोलन करण्यात येणार आहे. शहागड येथील पैठण फाट्यावर मराठा समाजाच्या वतीने हे आंदोलन केले जाणार आहे.
आरक्षण मिळावे व इतर मागण्यासाठी हे जनआक्रोश आंदोलन होत असून, या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. ज्यात औरंगाबाद आणि जालना या दोन्ही जिल्ह्यातील पोलिसांकडून वाहतूक बदल करण्याबाबत पत्र काढण्यात आले आहे.
जालना येथील पैठण फाट्यावर होणाऱ्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. तर, वाहनांच्या रहदारीमुळे क्षुल्लक बाबीवरुन वादग्रस्त परिस्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे यामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जालना आणि औरंगाबाद पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
ज्यात 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाचे आदेश जालना पोलीस दलाचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी जारी केले आहे. तर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून देखील असेच आदेश काढण्यात आले आहेत.





