Kolkata fire : कोलकात्यातील हॉटेलला भीषण आग; बालकासह ९ जणांचा गुदमरून मृत्यू, ६ जखमी
मृत्यू झालेल्यांमध्ये भारतीय आणि बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. अग्निशामक दलाने तातडीने कारवाई करत ८० हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढले.

Kolkata fire : मध्य कोलकात्यातील मिर्झा गालिब स्ट्रीटवरील एका पाच मजली इमारतीमध्ये बुधवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ४ वर्षांच्या बालकासह ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ६ जण गंभीर जखमी झाले.
मृत्यू झालेल्यांमध्ये भारतीय आणि बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. अग्निशामक दलाने तातडीने कारवाई करत ८० हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढले.
पहाटे २:०७ च्या सुमारास ही आग लागली. ५ अग्निशामक गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. बहुतांश जणांचा मृत्यू धुरामुळे गुदमरून झाल्याचे अग्निशमन व आपत्कालीन सेवा मंत्री कौशिक चौधरी यांनी सांगितले.
या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर ४ ते ५ हॉटेल्स चालवली जात होती. अत्यंत अरुंद खोल्या आणि खिडक्यांचा अभाव यामुळे धूर बाहेर पडू शकला नाही, ज्यामुळे नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता असून, फॉरेन्सिक टीमने तपास सुरू केला आहे.
इमारतीच्या मालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे. घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.
अवघ्या दोन दिवसांपूर्वी बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या आगीत ९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेचच कोलकात्यात घडलेल्या या घटनेमुळे राज्यभरातील हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसेसच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.





