Iran: इराणमध्ये लष्करी तळांजवळ भीषण आग; अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान स्फोटांचे वृत्त, युद्धाची टांगती तलवार
iran: ही आग ज्या ठिकाणी लागली, तो परिसर तेहरान प्रांतातील अनेक लष्करी आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या तळांच्या अगदी जवळ आहे. काही स्थानिक नागरिकांनी या दरम्यान स्फोटांसारखे आवाज ऐकल्याचा दावा केला असला, तरी अधिकृतपणे अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही.

Iran: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच, बुधवारी राजधानी तेहरानजवळील पारंद भागात भीषण आगीची घटना घडली आहे. सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीमुळे परिसरात काळ्या धुराचे मोठे लोट उठले असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. ही आग ज्या ठिकाणी लागली, तो परिसर तेहरान प्रांतातील अनेक लष्करी आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या तळांच्या अगदी जवळ आहे. काही स्थानिक नागरिकांनी या दरम्यान स्फोटांसारखे आवाज ऐकल्याचा दावा केला असला, तरी अधिकृतपणे अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही.
ईराणच्या अधिकृत आयआरआयबी (IRIB) न्यूजने पारंद अग्निशमन विभागाच्या हवाल्याने स्पष्ट केले आहे की, शहराच्या जवळ दिसणारा हा काळा धूर पारंद नदीच्या कडेला असलेल्या गवताला लागलेल्या आगीमुळे आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या भागात गेल्या काही आठवड्यांत अनेक रहस्यमयी स्फोट आणि आगीच्या घटना घडल्या आहेत, ज्याबाबत ईराणी अधिकार्यांनी अद्याप कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही. त्यामुळे या ताज्या घटनेकडेही संशयाने पाहिले जात आहे.
लष्करी संघर्ष सुरू होण्याची ९० टक्के शक्यता –
दुसरीकडे, अमेरिका आणि ईराणमधील संघर्षाने आता गंभीर वळण घेतले आहे. एक्सिओसच्या (Axios) एका खळबळजनक अहवालानुसार, येत्या काही दिवसांत किंवा आठवड्यांत दोन्ही देशांमध्ये लष्करी संघर्ष सुरू होण्याची ९० टक्के शक्यता आहे. व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आणि ट्रम्प यांच्या सल्लागाराने दिलेल्या माहितीनुसार, ईराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबतची मुत्सद्देगिरी अपयशी ठरल्यास अमेरिका मोठी लष्करी कारवाई करू शकते. ही मोहीम केवळ एक छोटा हल्ला नसून, अनेक आठवडे चालणारा मोठा लष्करी संघर्ष असू शकतो, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
یک شهروند با ارسال ویدیویی به ایراناینترنشنال از شهر پرند استان تهران، از شنیده شدن صدای انفجار و برخاستن دود به آسمان در روز چهارشنبه ۲۹ بهمن در این منطقه خبر داد. pic.twitter.com/EVTmep8h4s
— ايران اينترنشنال (@IranIntl) February 18, 2026
या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ईराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेला कडक शब्दांत इशारा दिला आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले आहे की, अमेरिका सातत्याने आपल्या युद्धनौकांचा धाक दाखवत असली, तरी त्या युद्धनौकेपेक्षा तिला समुद्राच्या तळाशी पाठवणारे आमचे शस्त्र अधिक धोकादायक आहे. जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यालाही कधीकधी इतकी मोठी जखम होऊ शकते की ते पुन्हा सावरू शकणार नाहीत, अशा शब्दांत खामेनी यांनी अमेरिकेला प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे आखाती देशांमधील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे.
अमेरिका आणि इराणमध्ये का सुरु आहे वाद?
अमेरिका आणि इराणमधील वाद हा प्रामुख्याने ‘अण्वस्त्र’ आणि ‘वर्चस्वाचा’ लढा आहे. अमेरिकेला असे वाटते की इराण चोरून अणुबॉम्ब बनवत आहे, ज्यामुळे जगाला आणि विशेषतः अमेरिकेच्या मित्रदेशांना धोका निर्माण होऊ शकतो. या संशयावरून अमेरिकेने इराणवर कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत, म्हणजे इराणला जगासोबत व्यापार करणे किंवा आपले तेल विकणे कठीण झाले आहे. यामुळे इराणची आर्थिक स्थिती खालावली आहे आणि ते अमेरिकेवर प्रचंड संतापलेले आहेत.
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे मध्यपूर्वेतील (Middle East) सत्तासंघर्ष. इराण हा त्या भागातील एक शक्तिशाली देश आहे आणि तो अमेरिकेच्या कट्टर शत्रू मानल्या जाणाऱ्या काही गटांना मदत करतो. तर दुसरीकडे, अमेरिका त्या भागात आपली लष्करी ताकद वाढवून इराणवर वचक ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. इराणला वाटते की अमेरिका त्यांच्या अंतर्गत विषयात उगाच दखल देत आहे, तर अमेरिकेला वाटते की इराण दहशतवादाला खतपाणी घालत आहे.
या सर्व वादात आता तेल ओतण्याचे काम अण्वस्त्र कराराने केले आहे. काही वर्षांपूर्वी झालेला करार अमेरिकेने मोडला आणि तेव्हापासून दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करण्याच्या धमक्या देत आहेत. आता तर परिस्थिती इतकी बिघडली आहे की, कोणत्याही क्षणी या दोन देशांमध्ये मोठे युद्ध सुरू होऊ शकते, अशी भीती संपूर्ण जगाला वाटत आहे. हा वाद केवळ दोन देशांचा नसून तो संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर आणि शांततेवर परिणाम करणारा आहे.





