मॅक्वेन (अमेरिका) : अमेरिकेत टेनेसी प्रांतातल्या ग्रामीण भागात स्फोटकांच्या कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटामध्ये किमान १६ जण ठार झाले आहेत. या स्फोटाचा आवाज कित्येक मैल दूरपर्यंत ऐकू गेला होता. लष्कराला स्फोटके पुरवणाऱ्या आणि संशोधन करणाऱ्या ऍक्युरेट एनर्जेटिक सिस्टीम्स प्लांट या कारखान्यात हा स्फोट झाला. या स्फोटामुळे कंपनीच्या आवारातील वाहनेही जळून गेली. या स्फोटाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. स्फोटानंतर कारखान्यात लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण इमारत जळून गेली आणि कारखान्यात उपस्थित असलेल्यांपैकी कोणीही जिवंत वाचू शकले नाही. स्फोट शुक्रवारी संध्याकाळी झाला. पण स्फोटामुळे किती भयानक नुकसान झाले, हे शनिवारी उघड झाले. स्फोटामुळे मरण पावलेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जात आहे. ओळख पटवण्यासाठी डीएनए तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.घटनास्थळी ३०० मदत कर्मचारी तैनात करण्यात आले असून स्फोटामुळे कारखान्यातील स्फोटक साहित्याचे किती नुकसान झाले आहे, त्याचा आढावा घेतला जातो आहे. तसेचच अल्कोहोल,तंबाखू, घातक शस्त्रे आणि स्फोटकांचे तज्ज्ञ आणि बॉम्ब तज्ज्ञ देखील घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत.