जम्मू-कश्मीरमधील किश्तवाड ढगफुटीत CISFच्या दोन जवानांसह 38 जणांचा मृत्यू: मचैल माता यात्रा मार्गावर दुर्घटना; पीएम मोदींकडून मदतीचे आश्वासन

किश्तवाड: जम्मू-कश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चशोती गावात मचैल माता यात्रा मार्गावर गुरुवारी दुपारी १२ ते १ च्या सुमारास ढगफुटी झाल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) दोन जवानांसह किमान ३८ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत १२० जणांना वाचवण्यात यश आले असून, त्यापैकी ३८ जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर मचैल माता यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
बचाव कार्याला गती –
प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत राहत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. राष्ट्रीय आपदा प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपदा प्रतिसाद दल (SDRF), पोलीस, लष्कर आणि स्थानिक स्वयंसेवक मोठ्या प्रमाणावर बचाव कार्यात सहभागी आहेत. चशोती गावातून ९,५०० फूट उंचीवरील मचैल माता मंदिरापर्यंत ८.५ किलोमीटरची पायी यात्रा सुरू होते, जिथे मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
पीएम मोदींकडून मदतीचे आश्वासन –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेनंतर प्रभावितांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. त्यांनी ‘X’ वर पोस्ट करत म्हटले, “किश्तवाडमधील ढगफुटीच्या आणि पूरस्थितीच्या घटनेमुळे प्रभावित सर्वांप्रती माझ्या संवेदना आणि प्रार्थना आहेत. परिस्थितीवर बारीक नजर ठेवली जात आहे. बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. गरजूंना सर्वतोपरी मदत पुरवली जाईल.”
अमित शाह यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला आणि सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले की, चशोती गावात बचाव आणि राहत कार्य पूर्ण वेगाने सुरू आहे. “घटनास्थळी मदतकर्मी आणि यंत्रसामग्री पाठवण्यात आली आहे. आणखी काही पथकेही पाठवली आहेत,” असे त्यांनी सांगितले.
सिन्हा यांनी ‘X’ वर व्यक्त केलेल्या शोकसंदेशात म्हटले, “चशोती येथील ढगफुटीच्या घटनेने व्यथित झालो आहे. शोकाकुल कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. नागरी, पोलीस, लष्कर, NDRF आणि SDRF यांना बचाव आणि मदत कार्य गतिमान करण्याचे आणि प्रभावितांना सर्वतोपरी मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.
”हेल्पलाइन क्रमांक जारी
प्रशासनाने नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत: 01374-222126, 222722, 9456556431. या आपत्तीने किश्तवाडमधील परिस्थिती गंभीर बनली असून, बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.





