Masoud Pezeshkian : इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान पाकिस्तानच्या दौऱ्यावर

इस्लामाबाद : इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान २ दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर असून या भेटीदरम्यान ते प्रादेशिक संघर्षाच्या अनुषंगाने पाकिस्तानच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या निमंत्रणावरून ते पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या समवेत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची, वरिष्ठ मंत्री आणि अन्य उच्चस्तरिय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ देखील पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले आहे.
या भेटीदरम्यान पेझेश्कियान हे पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची भेट घेणार असून पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील केली जाणार आहे. इराणचे अध्यक्ष झाल्यापासून पेझेश्कियान यांचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी २६ मे रोजी इराणला भेट दिली होती.
दोन्ही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ, पंजाबच्या मुख्यमंत्री मरीयम नवाज आणि राष्ट्रीय गृहनिर्माण मंत्री राईझ हुसैन पिरझादा यांनी लाहोर येथे पेझेश्कियान यांचे स्वागत केले.





