Maruti Suzuki : देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया आपल्या वाहनांच्या किमतीत लवकरच वाढ करण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाच्या, विशेषतः मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे कंपनीचा उत्पादन खर्च वाढला असून, याचा बोजा आता ग्राहकांवर पडण्याची चिन्हे आहेत. कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बॅनर्जी यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जागतिक राजकीय परिस्थिती आणि पुरवठा साखळीतील बदलांमुळे ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मारुती सुझुकीने विक्रीचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला – जानेवारी महिन्यात मारुती सुझुकीने विक्रीचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला असून एकूण २,३६,९६३ वाहनांची विक्री केली आहे. विशेष म्हणजे केवळ एका महिन्यात कंपनीला २.७८ लाख नवीन बुकिंग्स मिळाल्या आहेत, जे गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ टक्क्यांनी जास्त आहे. सध्या बाजारपेठेतून दररोज ९ ते १० हजार गाड्यांचे बुकिंग होत असून कंपनीच्या निर्यातीनेही ५१,०२० युनिट्ससह उच्चांक गाठला आहे. मागणी प्रचंड असली तरी उत्पादन क्षमतेच्या मर्यादेमुळे सध्या १.७५ लाख ग्राहकांना त्यांच्या गाड्यांच्या डिलिव्हरीची प्रतीक्षा करावी लागत आहे. बुकिंग केलेल्या ग्राहकांना दिलासा – दरवाढीची टांगती तलवार असली तरी, ज्या ग्राहकांनी आधीच कार बुक केली आहे त्यांच्यासाठी कंपनीने ‘प्राईस प्रोटेक्शन स्कीम’ जाहीर केली आहे. या योजनेनुसार, ज्यांनी गाडी बुक केली आहे पण अद्याप डिलिव्हरी मिळालेली नाही, अशा ग्राहकांना जुन्याच किमतीत गाडी दिली जाईल. पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळावा आणि त्यांच्यावर वाढीव खर्चाचा भार पडू नये, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले. Maruti Suzuki Cars Price 2026 भविष्यातील विस्तार आणि नवीन लॉंचिंग – उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मारुती सुझुकी वेगाने पावले उचलत आहे. हरियाणातील खरखौदा येथील नवीन प्लांट एप्रिल २०२६ पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता असून, त्यानंतर गुजरात प्लांटमध्येही नवीन प्रोडक्शन लाईन सुरू केली जाईल. यामुळे कंपनीची वार्षिक क्षमता ५ लाख युनिट्सनी वाढणार आहे. दरम्यान, कंपनीची बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक SUV ‘e VITARA’ याच महिन्यात बाजारात दाखल होत असून, तिची पाठवणी देखील सुरू झाली आहे. जीएसटी २.० मधील सवलती आणि पायाभूत सुविधांवरील सरकारी खर्चामुळे ऑटो क्षेत्रात पुन्हा ६ ते ७ टक्के वाढ होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.