‘मारुती सुझुकी’ने Alto K10, S-Presso कारच्या किंमती केल्या कमी

नवी दिल्ली – मारुती सुझुकी कंपनीने आपल्या काही प्रवासी वाहनांच्या दरात कपात जाहीर केली आहे. या कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अल्टो के 10 आणि एस प्रेसो या मॉडेलच्या दरात काही प्रमाणात कपात करण्यात आली आहे.
ही कपात 2,000 ते 6,500 दरम्यान करण्यात आली असल्याचे या कंपनीने म्हटले आहे. कंपनीने जारी केलेल्या पत्रकामध्ये दर कपातीचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र ऑगस्टमधील विक्रीत या कंपनीच्या छोट्या कारच्या विक्रीत घट झाली आहे. या कंपनीच्या छोट्या कारची विक्री 10,648 युनिटने कमी होऊन 12,209 युनिट इतकी झाली आहे. छोट्या कारची विक्री वाढावी या दृष्टिकोनातून या कंपनीने दर कपात केली असण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यापासून वाहन कंपन्यांच्या विक्रीत घट होत असल्याबद्दल या क्षेत्राकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच छोट्या कारपेक्षा मोठ्या एसयुव्ही कार जास्त प्रमाणात विकल्या जात आहेत. भारतातील आर्थिक परिस्थिती आणि भारतीय नागरिकांची परिस्थिती यावरून लवकरच लोक मोठ्या कारपेक्षा छोट्या कार विकत घेण्यास प्राधान्य देतील, अशी अपेक्षा गेल्या महिन्यात मारुती सुझुकी कंपनीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी व्यक्त केली होती.





