CNG Cars : मारुतीच्या ‘या’ व्हॅनला तोड नाही! 26 किमीपर्यंत मायलेज, 6 एअरबॅग्ज; जुलैमध्ये 13,896 युनिट्सची विक्री
CNG Cars : मारुती सुझुकी इकोने जुलै महिन्यात 13,896 युनिट्सच्या विक्रीसह बाजारात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. 26 किमी मायलेज, 6 एअरबॅग्स आणि बजेट किंमतीमुळे या कारला जोरदार मागणी आहे.

CNG Cars : मारुती सुझुकीची जुलै महिन्यातील वाहनविक्री दमदार झाली आहे. कंपनीने जुलै 2026 मध्ये तब्बल 1,96,203 वाहनांची विक्री केली. जुलै 2025 मधील 1,37,776 युनिट्सच्या तुलनेत विक्रीत 42 टक्क्यांची वाढ झाली आहे.
जून 2026 मध्ये कंपनीने 1,47,187 युनिट्स विकल्या होत्या. त्यामुळे मासिक विक्रीतही 33 टक्के वाढ नोंदवण्यात आली. या विक्रीवाढीमागे आगामी सणासुदीचा हंगाम हे एक प्रमुख कारण मानले जात आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर वाहन विक्रेते वाहनांचा साठा करून ठेवत आहेत.
मारुतीच्या या व्हॅनला थेट प्रतिस्पर्धी नाही –
मारुती सुझुकीच्या मोठ्या वाहन पोर्टफोलिओमध्ये हॅचबॅक, एसयूव्ही, एमपीव्ही, सेडान आणि व्हॅनचा समावेश आहे. कंपनीची डिझायर ही सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक असली, तरी जुलैमध्ये मारुती सुझुकी ईकोनेही दमदार कामगिरी केली.
ईको ही व्हॅन असून बाजारात तिचा थेट प्रतिस्पर्धी उपलब्ध नाही. जुलै 2026 मध्ये ईकोच्या 13,896 युनिट्स विकल्या गेल्या. जुलै 2025 मध्ये 12,341 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच वार्षिक विक्रीत 13 टक्क्यांची वाढ झाली. जूनच्या तुलनेत विक्री 36 टक्क्यांनी वाढली आहे.
किंमत आणि इंजिन –
मारुती सुझुकी ईकोची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.23 लाख रुपये आहे. ही व्हॅन 5 आणि 6 आसनी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोलसोबत सीएनजी पर्यायही मिळतो. सीएनजी मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.40 लाख रुपये आहे. याशिवाय ईको अॅम्ब्युलन्स प्रकारातही उपलब्ध असून त्याची किंमत 6.39 लाख रुपयांपासून सुरू होते.
ईकोमध्ये 1.2 लिटरचे के-सिरीज पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 80 बीएचपी पॉवर आणि 104 एनएम टॉर्क निर्माण करते. पेट्रोल प्रकारात 19.71 किमी प्रतिलिटर, तर सीएनजी प्रकारात 26.78 किमी प्रतिकिलोपर्यंत मायलेज मिळते.
6 एअरबॅग्जसह सुरक्षा सुविधा –
ईकोमध्ये 6 एअरबॅग्ज मानक स्वरूपात देण्यात आल्या आहेत. याशिवाय एबीएस, ईबीडीसह रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारख्या सुरक्षा सुविधा मिळतात. व्हॅनमध्ये अनेक रंगांचे पर्याय असून स्टायलिश क्लिअर-लेन्स हेडलॅम्प्सही देण्यात आले आहेत.





