Maruti Suzukiने कारच्या किंमती केल्या कमी, S-Pressoवर 1 लाख 29 हजारांची सूट, तर Brezzaवर….

Maruti Suzuki New Price List: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुति सुजुकी इंडियाने जीएसटी दर कपातीचा पूर्ण फायदा ग्राहकांना देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या कारच्या किंमतीत १.२९ लाख रुपयांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला असून, ही कपात २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होईल, अशी माहिती कंपनीने गुरुवारी स्टॉक एक्सचेंजला दिली. भारतीय प्रवासी वाहन उद्योगाला चालना देण्यासाठी मारुति सुजुकीने आपल्या एंट्री-लेव्हल कारांच्या किंमती कमी केल्या आहेत.
मारुति सुजुकीने आपल्या १८ मॉडेल्सच्या किंमतीत कपात केली असून, सर्वाधिक कपात एस-प्रेसो (S-Presso) मॉडेलवर १,२९,६०० रुपयांपर्यंत आहे. या मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत आता ३,४९,९०० रुपये असेल. तर, सर्वात कमी कपात जिम्नी (Jimny) मॉडेलवर ५१,९०० रुपयांपर्यंत आहे.
कंपनीने आपल्या जवळपास सर्व मॉडेल्सच्या किंमतीत कपात केली आहे.
| मॉडेल | एक्स-शोरूम किंमतीत कपात | सुरुवातीची किंमत (₹) |
|---|---|---|
| एस-प्रेसो | ₹1,29,600 पर्यंत | ₹3,49,900 |
| अल्टो K10 | ₹1,07,600 पर्यंत | ₹3,69,900 |
| सेलेरियो | ₹94,100 पर्यंत | ₹4,69,900 |
| वॅगनआर | ₹79,600 पर्यंत | ₹4,98,900 |
| इग्निस | ₹71,300 पर्यंत | ₹5,35,100 |
| स्विफ्ट | ₹84,600 पर्यंत | ₹5,78,900 |
| बलेनो | ₹86,100 पर्यंत | ₹5,98,900 |
| टुर एस | ₹67,200 पर्यंत | ₹6,23,800 |
| डिझायर | ₹87,700 पर्यंत | ₹6,25,600 |
| फ्रॉन्क्स | ₹1,12,600 पर्यंत | ₹6,84,900 |
| ब्रेझा | ₹1,12,700 पर्यंत | ₹8,25,900 |
| ग्रॅंड विटारा | ₹1,07,000 पर्यंत | ₹10,76,500 |
| जिम्नी | ₹51,900 पर्यंत | ₹12,31,500 |
| एर्टिगा | ₹46,400 पर्यंत | ₹8,80,000 |
| एक्सएल6 | ₹52,000 पर्यंत | ₹11,52,300 |
| इनविक्टो | ₹61,700 पर्यंत | ₹24,97,400 |
| इको | ₹68,000 पर्यंत | ₹5,18,100 |
| सुपर कॅरी | ₹52,100 पर्यंत | ₹5,06,100 |
मारुति, महिंद्रा यांच्यासह अनेक कंपन्यांनी केली किंमत कपात –
जीएसटी २.० अंतर्गत कर दर कमी झाल्यानंतर मारुति सुजुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, रेनॉ इंडिया, ऑडी आणि ह्युंदाय यांसारख्या अग्रगण्य कार कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किंमती कमी केल्या आहेत. महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या SUV मॉडेल्सवर १.५६ लाख रुपयांपर्यंत कपात केली आहे, तर रेनॉ इंडियाने ९६,३९५ रुपयांपर्यंत किंमती कमी केल्या आहेत. टाटा मोटर्सनेही जीएसटी कपातीचा पूर्ण फायदा ग्राहकांना देण्याची घोषणा केली आहे.
जीएसटीचे नवे नियम काय?
जीएसटी कौन्सिलने आता दोन कर स्लॅब ५% आणि १८% निश्चित केले आहेत. लहान कार (पेट्रोल, LPG, CNG, १२०० सीसीपर्यंत) आणि डिझेल कार (१५०० सीसीपर्यंत) आता २८% ऐवजी १८% कर स्लॅबमध्ये येतील. ३५० सीसीपर्यंतच्या मोटरसायकलीही १८% स्लॅबमध्ये असतील. इलेक्ट्रिक वाहनांवर ५% कर कायम राहील. मोठ्या कार, मोठ्या हायब्रिड्स, ३५० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या मोटरसायकली आणि रेसिंग कारांवर ४०% कर लागेल.
ग्राहकांसाठी लाभदायक निर्णय –
मारुति सुजुकीच्या या किंमत कपातीमुळे ग्राहकांना आता कमी किंमतीत त्यांच्या आवडत्या कार खरेदी करता येतील. कंपनीच्या या पावलामुळे भारतीय ऑटोमोबाइल बाजारात स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.





