प्रभात वृत्तसेवा पिंपरी – घर बांधण्यासाठी आणि नवीन दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यावरून एका महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले. याप्रकरणी पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छळाची घटना ज्योतिबा नगर काळेवाडी येथे घडली. विवाहितेने 28 जुलै रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. निर्मला परमेश्वर वाघमारे (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणात प्रकाश दादाराव वाघमारे (वय ३३, रा. तळवडे, पुणे) यांनी सोमवारी (दि. २८) काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती परमेश्वर श्रावण वाघमारे (वय ४०), सासू गवळणबाई श्रावण वाघमारे, दीर कमलाकर श्रावण वाघमारे, नणंद रमाबाई लेंडेगावकर (चौघेही रा. जगळपूर, जि. लातूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छळाची ही घटना २०२० पासून २८ जुलै २०२५ या कालावधीत काळेवाडी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मयत बहीण निर्मला वाघमारे (वय ३०) हिचा आरोपी पती परमेश्वर याच्या सोबत विवाह झाला. तीन वर्षांनंतर आरोपींनी आपसात संगनमत करून बहिण निर्मला हिला प्रापंचिक कारणावरून घालून पाडून बोलले. घर बांधण्यासाठी आणि नवीन दुचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याबाबत तिला वेळोवेळी सांगितले. तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. बहीण कामाला जाऊ लागल्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वेळोवेळी शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. आरोपींनी तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने तिने २८ जुलै रोजी राहते घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काळेवाडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.