Marriage Issues : अपेक्षांचे डोंगर अन् लग्नाचा खोळंबा; शेती असूनही मुलं अविवाहित का ? वाचा धक्कादायक वास्तव
Marriage Issues : बदलत्या जीवनशैलीमुळे विवाह प्रक्रिया झाली गुंतागुंतीची; करिअर आणि मोबाइलच्या आभासी विश्वात तरुण पिढी मग्न, पालकांची चिंता वाढली.

Marriage Issues – बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वधू-वरांच्या वाढत्या अवास्तव अपेक्षांमुळे पारंपरिक विवाह प्रक्रिया आता अधिक गुंतागुंतीची बनली आहे. मुले आणि मुली वास्तवाचे भान विसरून आभासी विश्वात (मोबाईल) मग्न आहेत, तर दुसरीकडे मुलांचे लग्न वेळेत होत नसल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. सामाजिक वास्तव आणि अपेक्षांमधील दरीमुळे विवाह जुळणे आता एक मोठे आव्हान ठरत आहे.
शेती किंवा छोट्या व्यवसायातील तरुणांना मुलींकडून नापसंती मिळत आहे. सरकारी नोकरी किंवा शहरात स्थायिक असलेल्या वरांनाच अधिक मागणी आहे. ‘शेतकरी नवरा नको, पण शेती हवी’ ही विसंगती ग्रामीण भागात प्रकर्षाने जाणवत आहे. त्यातच मुलाचे स्वतःचे घर, शहरात नोकरी आणि उच्च पगाराची अट यामुळे अनेक स्थळे बाद होत आहेत.
स्पर्धा परीक्षा आणि करिअरच्या नादात लग्नाचे वय ३० ते ३५ पर्यंत पोहोचले आहे. वयोमानानुसार अपेक्षा अधिक वाढतात आणि जुळवून घेण्याची वृत्ती कमी होते. आज ग्रामीण भागातील घरे ओस पडत आहेत. मुलांचे आवाज हरवले असून कुटुंब व्यवस्था एकुलत्या एका मुलावर किंवा घटस्फोटावर येऊन थांबली आहे. पाश्चात्य संस्कृतीचे आंधळे अनुकरण आणि शिक्षणाच्या नावाखाली लग्नाला होणारा विलंब यामुळे समाजात नैराश्य आणि वैफल्यग्रस्तता वाढत आहे.
परजिल्ह्यात शोध अन् अनाथाश्रमांचा पर्याय
मुले अविवाहित राहू नयेत म्हणून अनेक पालक आता परजिल्ह्यात किंवा परराज्यात वधूचा शोध घेत आहेत. काही कुटुंबांनी तर अनाथाश्रमातील मुलींशी विवाह करण्याचा संवेदनशील पर्यायही स्वीकारला आहे. वधू-वर सूचक मंडळांकडे नोंदणी करणाऱ्यांमध्ये तिशी ओलांडलेल्या उमेदवारांचे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
बदलती समीकरणे आणि वाढती चिंता
काही वर्षांपूर्वी वधूपित्याला योग्य वर शोधणे कठीण असायचे, मात्र आता हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. मुलींचे घटलेले प्रमाण आणि करिअरच्या अवाजवी संकल्पनांमुळे आता वरपित्यांना वधूपित्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. ‘मुलगी आणि नारळ द्या’ अशी भूमिका अनेक कुटुंबे घेत आहेत, तरीही स्थळे जुळत नसल्याने ग्रामीण भागातील कुटुंब व्यवस्था विस्कळीत होताना दिसत आहे.





