Pune: गोल्डन सीताफळाचा बाजार काळवंडला; हवामान बदलाचा फटका

पुणे – हवामानात सातत्याने होत असलेले बदल आणि अधिक काळ पाऊस राहिल्याने त्याचा मोठा फटका गोल्डन सीताफळाला बसला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत बाजारात या सीताफळाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी, त्यात सुमारे ७० टक्के माल हलक्या प्रतीचा आहे. त्यामुळे सीताफळाचे दर गडगडले आहेत.
मार्केट यार्डातील फळ बाजारात रोज ४० ते ५० टनाची आवक होत आहे. चांगल्या प्रतीच्या मालाला प्रतिकिलोला दर्जानुसार १५ ते ५० रूपये, तर हलक्या प्रतीच्या मालाला ५ ते ३० रूपये दर मिळत आहे. बाजारात पुणे, सातारा, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातून आवक होत आहे.
बाजारातून गुजरात, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात हे सीताफळ पाठविले जात आहे. यंदा फळ धारणा अधिक आहे. मात्र फळाचा दर्जा खालावलेला असल्याने दरात वाढ होण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली. मात्र सातत्याने बदलत असलेल्या हवामानाचा फटका सीताफळ उत्पादक शेतकर्यांना बसत असल्याचेही त्यांनी सांगितले.
“दीड महिन्यापासून गोल्डन सीताफळाचा हंगाम सुरू झाला आहे. डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यापर्यंत या सीताफळाची आवक अधिक असणार आहे. आवक अशीच राहिल्यास दर वाढण्याची शक्यता कमीच आहे.” – अरविंद मोरे, सीताफळाचे व्यापारी, मार्केट यार्ड
देठाला पडतोय काळा डाग…
अती पाऊस आणि हवामानातील बदलामुळे गोल्डन सीताफळ देठाच्या जागी काळे पडत आहे. देठाच्या जागी काळे पडलेल्या फळांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाजारात दाखल होत असलेल्या सीताफळात अशा फळाचे प्रमाण अधिक आहे.





