ओटावा: कॅनडाच्या निवडणुकीत मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखालील लिबरल पक्षाने विजय मिळवला असून, कार्नी पुन्हा पंतप्रधानपदावर विराजमान होण्याच्या मार्गावर आहेत. यंदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा मुद्दा गाजला, ज्यामुळे कॅनडातील मतदार एकजुटीने लिबरल पक्षाच्या पाठीशी उभे राहिले. कार्नी यांनी भारताशी संबंध सुधारण्याचे सकारात्मक संकेत दिले असून, व्यापार आणि रणनीतीक सहकार्य वाढवण्यावर त्यांचा भर आहे. भारताबाबत कार्नी यांची भूमिका – निवडणूक प्रचारादरम्यान कार्नी यांनी भारत-कॅनडा संबंधांना ‘अतिशय महत्त्वाचे’ संबोधले. “भारताशी वैयक्तिक, आर्थिक आणि रणनीतीक स्तरांवर घनिष्ठ संबंध आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेतील बदलांमुळे भारत आणि कॅनडा यांच्यासमोर मोठ्या संधी आहेत,” असे त्यांनी वाय मीडिया या वाहिनीला सांगितले. ट्रम्प यांच्या व्यापारी युद्धामुळे निर्माण झालेल्या संधींचा फायदा घेण्यासाठी ते भारताशी सहकार्य वाढवण्यास उत्सुक आहेत. यापूर्वी मार्च 2025 मध्येही त्यांनी भारतासोबत व्यापारी संबंध पुनर्स्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. कार्नी यांचा सकारात्मक दृष्टिकोन – माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या कार्यकाळात खलिस्तानी नेते हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येच्या मुद्द्यावरून भारत-कॅनडा संबंध तणावपूर्ण झाले होते. ट्रूडो यांनी भारतावर आरोप केले होते, ज्याला भारताने फेटाळले. यामुळे दोन्ही देशांनी राजनयिक संबंध कमी केले. मात्र, कार्नी यांनी भारताबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांनी टोरंटो येथील बाप्स स्वामीनारायण मंदिरात रामनवमी आणि ओटावा येथील गुरुद्वाऱ्यात बैसाखीच्या शुभेच्छा देऊन भारतीय समुदायाशी संवाद साधला. कार्नी यांचा प्रवास – मार्क कार्नी हे माजी बँकर असून, 2008-2013 दरम्यान बँक ऑफ कॅनडाचे गव्हर्नर आणि 2013-2020 दरम्यान बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होते. जानेवारी 2025 मध्ये ट्रूडो यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी लिबरल पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. हार्वर्ड आणि ऑक्सफर्डमधून अर्थशास्त्रात शिक्षण घेतलेल्या कार्नी यांनी ट्रम्प यांच्या धोरणांना कडाडून विरोध केला आहे. “ट्रम्प कॅनडावर वर्चस्व गाजवू इच्छितात, पण आम्ही ते होऊ देणार नाही,” असे त्यांनी विजयी भाषणात ठणकावले. कार्नी यांच्या नेतृत्वाखाली भारत-कॅनडा संबंधांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. त्यांची आर्थिक आणि राजनयिक धोरणे दोन्ही देशांमधील मैत्री आणि सहकार्य वाढवू शकतात. पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा – पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया ‘X’ वर मार्क कार्नी यांना शुभेच्छा देताना लिहिले, “मार्क कार्नी यांना कॅनडाचे पंतप्रधान म्हणून निवड आणि लिबरल पक्षाच्या विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भारत आणि कॅनडा सामायिक लोकशाही मूल्ये, कायद्याचे शासन आणि दोन्ही देशांतील नागरिकांमधील दृढ नातेसंबंधांनी जोडले गेले आहेत. दोन्ही देशांमधील भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी आणि आपल्या नागरिकांसाठी नव्या संधी निर्माण करण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.”