आगामी काळात मराठवाडा सर्वात मोठे औद्योगिक केंद्र बनणार – मंत्री पियुष गोयल

मुंबई – छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीला देशातलं उत्तम औद्योगिक क्षेत्र बनवण्याचा संकल्प असून येत्या काळात मराठवाडा हे सर्वात मोठं औद्योगिक हब असेल, असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथे पत्रकाराशी बोलत होते.
ऑरिक सिटीत जवळपास सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, याठिकाणी घरं, रुग्णालयं, विद्यापीठ यांसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं. या औद्योगिक क्षेत्रात कौशल्य विकास केंद्र तसंच स्टार्ट अप इन्क्यूबेशन हब बनवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मराठवाड्यातील औद्योगिक परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहे. या अनुषंगाने स्थानिक उद्योजकाबरोबर चर्चा करण्यात आली असून येथील कौशल्य विकास वाढविण्यासाठी कौशल्य विकास केंद्र 20,000 वर्ग फूटावर उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मराठवाड्यात स्टार्टअप्ची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
या औद्योगिक वसाहतीत बर्याच जागा काही कंपन्यांनी घेतल्या आहेत. मात्र विकसित केलेल्या नाहीत. या बाबीकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, याचा आढावा घेण्यात येत आहे. जे जमिनीचा वापर करणार नाहीत त्यांच्याकडून जमीन घेऊन त्या वापर करणार्यांना देण्याचे शक्यतेवर विचार करण्यात येत आहे.
रुपया घसरलेला नाही
दरम्यान रुपयाचे मूल्य घसरत असल्याच्या बाबीकडे लक्ष वेधले असता गोयल यांनी सांगितले डॉलर वगळता की इतर चलनाच्या तुलनेत रुपयाचे मूल्य मुळीच घसरलेले नाही. इतर चलनापेक्षा रुपयाचे मूल्य स्थिर आहे. कारण भारताकडे मोठ्या प्रमाणात परकीय चलन साठा असल्याचे गोयल यांनी सांगितले.





