मराठवाडा ही गुणवंतांची खाण : डॉ. पुलकुंडवार

पुणे – मराठवाड्यामध्ये आतापर्यंत विकासाचा अनुशेष होता. मागील काही सरकारांमुळे हा अनुशेष भरण्याच्या प्रयत्न झाला आहे. असे असले तरीही मराठवाड्यात गुणवंताची कमी नाही. सर्वांच्या प्रयत्नांतून मराठवाड्याचा विकास नक्कीच होईल. अशी अपेक्षा विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी येथे व्यक्त केली.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा समन्वय समितीतर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, पदाधिकारी किशोर पिंगळीकर, दत्ता म्हेत्रे उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मराठवाड्यातील भूमिपुत्रांना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे, एमआयटी संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुनीता कराड, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, निवृत्त कृषी संचालक रामकृष्ण मुळे, हायटेक सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश वाघमारे यांना या वेळी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात समितीच्या “वैभवशाली मराठवाडा’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.





