अधिवेशनापूर्वी मातोश्रीवर ‘मॅरेथॉन बैठक’, उद्धव ठाकरेंकडून आमदारांना 5 महत्त्वाच्या सूचना, अधिवेशनात होणार गदारोळ

मुंबई – राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात सुरू होत आहे. अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यातच बुधवारी रात्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री येथे पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडली.
जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीत उद्धव यांनी आमदारांना अधिवेशन काळात सरकारविरोधात आक्रमक होण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून वारंवार होत होती. त्यानुसार आता राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणावरुन सुरू असलेला संघर्ष, पुण्यातील ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण, कंत्राटी भरती, राज्यातील दुष्काळजन्य स्थिती, पाण्याचा प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान या मुद्द्यांवरून अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनाची वेळ वाढविण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे.
या अधिवेशनातही पुरवणी मागण्या मांडण्यात येणार असून, त्या मंजुरीसाठी विनियोजन विधेयक सादर केले जाईल. मागील अधिवेशनातील रेकॉर्डब्रेक पुरवणी मागण्यानंतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणखी किती हजार कोटींच्या पुरवणी मागण्या असतील, याबाबत उत्सुकता आहे.
आमदारांना केलेल्या सूचना
१. सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आपली भूमिका ठामपणे मांडा.
२. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी त्यांच्या बांधावर जा.
३. शेतकऱ्यांच्या नुकसानीची तीव्रता जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून देत जास्तीत जास्त मदतीची मागणी करा.
४. पीकविम्याचा मुद्दा आक्रमकपणे मांडा.
५. मुंबईमधील आमदारांनी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवरून आक्रमक भूमिका घ्यावी.




