Dr.Tara Bhawalkar : मराठी भाषा संतांनी टिकवली; डॉ. तारा भवाळकरांनी व्यक्त केले परखड मत

नवी दिल्ली : मराठी फक्त लिखीतच नाही तर ती बोलीतून पसरली आहे. भाषा ही जोडणारी गोष्ट असायला हवी, तोडणारी नाही. ज्या दिवशी आईने आपल्या बाळासाठी पहिली ओवी म्हटली त्यावेळी मराठीचा उगम झाला. मराठी भाषा संतांनी टिकवली, ‘फुरोगामी’ लोकं काहीही म्हणोत, आमचे संत मात्र पुरोगामीच होते. त्यामुळे पंतप्रधान महाशय, तुम्हाला भेट म्हणून दिलेली विठ्ठल – रुख्मिणीची मूर्ती ही आमच्या उदारपणाचे प्रतीक आहे, असे परखड मत दिल्लीतील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.
एक स्त्री अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली हे महत्वाचे नाही तर गुणवत्ता हा विषय महत्वाचा आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.भाषा ही बोलली तर जीवंत राहते, नुसती पुस्तकात आणि ग्रंथात असून उपयोग नाही. महाराष्ट्राला पाडुंरंगाचे स्मरण करायला लावणारी ही मराठी भाषा आमच्या संतांनी जीवंत ठेवली व त्यामुळेच, छत्रपती शिवाजी महाराजांना खेड्यापाड्यातील मावळे मिळाले. ज्या ठिकाणी हे संमेलन होत आहे, त्या ठिकाणी मराठी माणसांनी कधीतरी छावणी टाकली होती हा इतिहास आपल्याला ठावूक आहे, असेही असेही भवाळकर म्हणाल्या.
‘कांबळ खांदी वहाण पायीं डोईस मुंडासें, श्यामलवर्णी सान रूप तव सोज्वळ मज भासे’, असे म्हणत, आत्ताच आपण विठ्ठलाची मूर्ती पाहिली. ती गोऱ्या रंगाची त्याला हाऊस नाही. तो सावळाच आहे. केवळ सावळाच नाही तर तो काळा सावळा आहे. त्याचे भक्त सर्व जातीजमातींचे व धर्माचे आहेत, असेही भवाळकर पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हणाल्या.
‘जैविकतेच्या’ विधानावरून मोदींना टोमणा
शिवला तर विटाळ होतो आणि दुसरा स्त्रीचा. निसर्ग धर्माने दिलेली मासिक पाळी तिची! त्यालाही विटाळच म्हणायचे. आता ही बाई कुठल्याही शाळा, कॉलेजात गेली नाही, कुठल्याही स्त्री मुक्तीवालीकडे गेली नाही, तिला कुठली ‘सिमोन दि बोव्हा’ माहिती नव्हती. ती काय म्हणते ? ‘देहाचा विटाळ, देहीचं जन्मला, शुध्द तो जाहला कवण प्राणी।। उत्पत्तीचे मूळ विटाळाचे स्थानं। कोण देह निर्माण नाही जगी।।’ असा मला एखादा माणूस दाखवून द्या की, जो विटाळाच्या स्थानातून जन्माला आला नाही. आता एखादा उठतो व म्हणतो की, माझा जन्म जैविक नाही वगैरे, त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा हा वेगळा विषय आहे. परंतु, त्याचा भंडाफोड या आमच्या संत कवयित्रींनी १३ आणि १४ व्या शतकामध्ये केला आहे, असे म्हणत भावळकरांनी पंतप्रधांना मोदींना ‘जैविकतेच्या’ विधानावरून टोमणा हाणाला.
कुंकवाच्या दाब बिंदूमुळे स्त्रियांचे मानसिक स्वास्थ्य ठीक होत असेल तर मानसिकदृष्ट्या जास्त स्वास्थ्याची गरज कोणाला आहे? लग्न झालेल्या बायकांना की विधवांना?. कारण मानसिकदृष्ट्या त्या जास्त असुरक्षित आहेत. मग विधवांना आम्ही कुंकू लावायचीच मनाई करणार असू तर या ‘सायंटिफिक रिझन’ला अर्थ काय? त्यामुळे याला आम्ही ‘फेक सायन्स’, ‘स्यूडो सायन्स’, म्हणणार का?
– डॉ. तारा भवाळकर, संमेलनाध्यक्ष





