“फुलवंती” येणार ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi cinema । अभिनय, उद्योजिका, सुत्रसंचालक अशा विविध जबाबदाऱ्या लिलया सांभाळणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. फुलवंती या चित्रपटाची अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर घोषणा केली होती. ‘फुलवंती’.. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती आता रुपेरी पडद्यावर येणार आहे.
पॅनोरमा स्टुडिओज आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘फुलवंती’ चित्रपट पॅनोरमा स्टुडिओजची आजवरची सर्वात मोठी मराठी चित्रपट निर्मिती ठरणार आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी यानिमित्ताने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहे.
View this post on Instagram
दरम्यान आज या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर या चित्रपटातील तिचा लुक शेअर करत लिहिले आहे की,’११ ॲाक्टोबर २०२४ पासून तुमच्या मनावर राज्य करायला येतेय… “फुलवंती”…. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात… #PanoramaStudios सादर करीत आहेत. मंगेश पवार ॲंड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित; पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या अजरामर कादंबरीवर साकारली जातेय.. “फुलवंती”
या चित्रपटाचे लेखन-संवाद प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. यापूर्वी पखवाज आणि घुंगरांच्या जुगलबंदीचं ‘फुलवंती’ चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर प्रदर्शित करण्यात आल होत. पखवाज आणि घुंगरांची रंगणारी जुगलबंदी रसिकांसाठी मनोरंजनाची अपूर्व पर्वणी ठरणार आहे.





