Santosh Juvekar : संतोष जुवेकरची आई-बाबांसाठी खास पोस्ट, प्रेम व्यक्त करत म्हणाला…

Santosh Juvekar Post : मराठी अभिनेता संतोष जुवेकरला मोरया, झेंडा, एक तारा सारख्या लोकप्रिय चित्रपटांसाठी ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘रानटी’ या चित्रपटातील त्याची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली होती. नुकतेच त्याने त्याच्या आईबाबांसाठी सोशल मीडियावर केलेली खास पोस्ट व्हायरल होत आहे.
संतोषच्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस दोन दिवसांपूर्वी झाला. त्यानिमित्ताने त्याने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमधून त्याने आई बाबाविषयी असलेले प्रेम व्यक्त केले आहे.
संतोषने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, काल आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि आज मी पोस्ट शेअर करतोय. कारण, मला हवा तसा फोटो सापडत नव्हता आणि आज सापडला, त्यांचा हा फोटो मला खूप आवडलाय. आईने काल बाबांना स्मार्टफोन गिफ्ट केला आणि ती त्यांना तो कसा वापरायचा हे शिकवत होती आणि बाबा आईचे नीट लक्ष देऊन ऐकत होते. अगदी असच ते लग्न झाल्यापासून आईचच लक्ष देऊन ऐकत आले आहेत. म्हणून आजही सुरक्षित आणि उत्तम आयुष्य जगतायत.
‘आईने काल तिची लग्नातली आठवण शेअर केली. तिने सांगितलं लग्न झाल्यावर सासरी जाताना तिची आई म्हणाली होती “आता तू आमची राहिली नाहीस, आता तु तुझा संसार तू सांभाळ खंबीरपणे. हागल्या पादल्याला माहेरी यायचं नाही. तुमचे प्रश्न तुम्ही सोडवा. पादा पण नांदा’, असा मजेशीर किस्सा अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये सांगितला.
‘आणि आई बाबा मला तुमचा खूप अभिमान आहे तुम्ही दोघांनी करून दाखवलत, लढलात, पडलात, पुन्हां लढलात, तुम्ही तुमच्या संसारासाठी अगदी आमच्या सकट जे केलं आहे, ते खूप अमूल्य आहे आणि तुमच्या प्रेमाची आणि कष्टाची जाण आम्हाला कायम राहो, हाच तुमचा आणि देवाचा आम्हाला आशिर्वाद लाभुदे’, अशा शब्दात संतोषने आई बाबांवरील आपले प्रेम व्यक्त केले.





