मराठा आरक्षणामुळे ओबीसी कोट्यावर परिणाम होणार नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे यांनी अनिश्चितकालीन उपोषण सुरू केले आहे. यावर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना कायदेशीर चौकटीत राहून निर्णय घेतला जाईल आणि याचा ओबीसी (इतर मागासवर्ग) कोट्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
“एकाचा हक्क हिसकावून दुसऱ्याला देणार नाही”
“एका समाजाचे हक्क काढून दुसऱ्या समाजाला देणे शक्य नाही. ही सरकारची भूमिका नाही आणि मराठा समाजाचीही अशी मागणी नाही,” असे शिंदे यांनी सांगितले. त्यांनी पुढे म्हटले, “मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले होते, ज्याचा आजही लाभ मिळत आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मराठा समाजाला आरक्षण दिले होते, परंतु महाविकास आघाडी सरकारला ते टिकवता आले नाही. मी मराठा समाजाला विनंती करतो की, कायदेशीर मार्गाने जे शक्य आहे ते आम्ही नक्की करू.”
उद्धव ठाकरेंवर टीका –
शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “उद्धव ठाकरे फक्त मतांसाठी राजकारण करत आहेत. त्यांच्याकडे खरोखर हिम्मत असती, तर त्यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी काहीतरी केले असते. त्यांना मराठा समाजाबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही,” असे शिंदे म्हणाले.
कायदेशीर मार्गाने पावले उचलणार –
“आम्ही शक्य तेवढे प्रयत्न केले आणि पुढेही कायदेशीर चौकटीत राहून जे शक्य आहे ते करू,” असे आश्वासन शिंदे यांनी दिले. त्याचबरोबर, सर्व समाजांनी सामाजिक सलोखा राखावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जरांगे यांचे उपोषण
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांनी आझाद मैदानात अनिश्चितकालीन आमरण उपोषण सुरू केले आहे. “मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील,” अशी ठाम भूमिका पाटील यांनी घेतली आहे.महाराष्ट्र सरकार या संवेदनशील मुद्द्यावर कशा प्रकारे तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





