Maratha Reservation : ‘मुंबईतील गर्दी पाहून विजयाचे आराखडे’; उदय सामंत यांचा विरोधकांना टोला

Uday Samant – मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी संयम ठेवला पाहिजे. आज जे लोक त्यांना आपले वाटत आहेत, त्यांनी आरक्षण दिले का, हे देखील त्यांनी तपासले पाहिजे. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण एकनाथ शिंदे यांनी दिले, त्याला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचीही साथ होती, असे सांगत मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे की, मराठा आंदोलनासाठी मुंबईत जमलेली गर्दी पाहून काही लोक विजयाचे आडाखे बांधत आहेत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगाविला.
उदय ठाकरे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल. केंद्र सरकारकडून घटनेमध्ये बदल करुन काही करायचा असेल तर ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार करतील. मात्र माझा विरोधकांना प्रश्न आहे की, ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही, याचे उत्तर विरोधकांनी दिले पाहिजे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देताना, मराठा समाज त्यामध्ये बसणार आहे का? बसवावा का? याचे उत्तर विरोधकांनी दिले पाहिजे.
सर्वजण राजकारण करत आहेत. मनोज जरांगे यांच्या गर्दीकडे बघून स्वतःच्या विजयाचे आराखडे तयार करत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्र काढले पाहिजे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचे असेल तर तसे स्पष्ट केले पाहिजे. नसेल द्यायचे तर नाही म्हणून पत्र काढले पाहिजे. दुटप्पी भूमिका का घेत आहेत, असा सवाल उदय सामंत यांनी विरोधकांना केला.
आमची भूमिका आहे की, मराठा समजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये, मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकले पाहिजे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मराठा समजाला न्याय देताना ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये ही आमची भूमिका आहे.




