पुणे | मराठा महासंघ मोहोळांच्या पाठीशी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अखिल भारतीय मराठा महासंघाने पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा जाहीर केला आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप, उपाध्यक्ष संतोष नानवटे, सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, राज्य संपर्कप्रमुख अनिल ताडगे, शहराध्यक्ष वैभव शिळमकर, सरचिटणीस मयूर गुजर, महिला प्रमुख आरती मारणे, जयश्री साळुंके, सविता मारणे यांची प्रमुख या वेळी उपस्थिती होती. महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी पाठिंब्याचे पत्र स्वीकारले.
जगताप म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण महायुतीने दिले आहे. राज्यात १९९८ मध्ये युतीचे सरकार असताना मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना केली. त्यानंतर सन २००० ते २०१४ काँग्रेसच्या सत्ताकाळात महामंडळाचे कामकाज ठप्प झाले होते. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी निधी देऊन महामंडळाचे पुनरुज्जीवन केले.
आज ८६ हजारांहून अधिक मराठा युवकांना या महामंडळाचा लाभ झाला आहे. महायुतीच्या सरकारने विविध खात्यांत निवड झालेल्या २२७० मराठा उमेदवारांना नियुक्त्या दिल्या. सारथीच्या माध्यमातून समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजनांचा लाभ झाला. आगामी काळात महायुतीच्या माध्यमातून समाजाचे आरक्षण टिकू शकेल, या विश्वासाने पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा दिला असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.





