पुणे जिल्हा | मराठा महासंघ शेतकर्यांच्या पाठीशी

लोणी काळभोर, (वार्ताहर) -मांजरी उपबाजार हा शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारीत आहे. त्यातून शेतकर्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळतो; परंतु या बाजारात दुबार विक्री करणारे व्यापारी व खोतीदार यांनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी केल्याने शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. काहीवेळा तर माल विकला सुद्धा जात नाही.
यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. मराठा महासंघ या आंदोलनात शेतकर्यांच्या पाठीशी असून दुबार विक्री करणारे व्यापारी व खोतीदार यांना तातडीने बंदी घालावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा महासंघाचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस गुलाब गायकवाड यांनी दिला.
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात खोतीदार व दुबार विक्री करणारे व्यापारी यांच्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत असून त्यांना मांजरी उपबाजारात बंदी घालावी या मागणीसाठी गेली आठ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या आठव्या दिवशी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाला आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला. या वेळी गुलाब गायकवाड बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी, शेतकरी संघटनेचे सूर्यकांत काळभोर, मराठा महासंघ युवती तालुकाध्यक्ष पूजा सणस, कोलवडी विविध कार्यकारी संस्थेचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब गायकवाड, सुभाष गायकवाड, शिवसेना शाखा प्रमुख राजाराम गायकवाड, अमित कांचन व आंदोलक शेतकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.





