मराठा महासंघ भाजप-महायुतीच्या पाठीशी; कसबा मतदारसंघात हेमंत रासने यांना पाठिंबा

पुणे – मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीची तीव्रता लक्षात घेऊन राज्यात पहिल्यांदा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. ते उच्च न्यायालयात टिकवूनही दाखविले. मात्र, २०१९ मध्ये राज्यात सत्तेत आलेल्या उद्धव ठाकरे-महाविकास आघाडी सरकारने ते घालविले.
त्यामुळे समाजाला सर्वप्रथम आरक्षण मिळवून देणाऱ्या भाजप-महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत रासने यांच्या पाठीशी मराठा महासंघ ठामपणे उभा राहील, असा विश्वास अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे यांनी व्यक्त केला.
रासने यांना पाठिंबा देण्यासाठी महासंघाच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. संतोष नानवटे, अनिल ताडगे, दुष्यंतराजे जगताप, मयूर गुजर, राजेश केदारी, नरेंद्र मोहिते, अमित साळुंखे, विनायक मिसाळ, वनिता जगताप, जगदीश गाडेकर, राहुल पवार, शेखर तूपसुंदर, विकास जाधव, इंद्रजीत शिंदे, गहिनीनाथ गायकवाड उपस्थित होते.
आरक्षण टिकविणे आमची जबाबदारी : रासने
यावेळी रासने म्हणाले, महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आणि ते टिकविण्याची आमची जबाबदारी आमची आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे महायुतीने पुनरुज्जीवन करुन एक लाखाहून अधिक उद्योजकांना ८३२० कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेतून आर्थिक मागास १७ लाख ५५ हजार विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी ९ हजार २६२ कोटी रुपये मंजूर केले.
सारथी राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती योजनेतून यूपीएससीत- ५१ आणि एमपीएससीत ४८० उमेदवार यशस्वी झाले. “सारथी’मार्फत ८० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली. तर राज्यातील पुढील महायुतीचे सरकार मराठा समाजाच्या सोबतीला खंबीरपणे उभे असेल, अशी ग्वाहीदेखील रासने यांनी यावेळी दिली.





