१५ वर्षांपासून फरार माओवादी प्रशांत कांबळे उर्फ “लॅपटॉप” अटकेत

पुणे : ठाणे येथे दाखल गंभीर गुन्ह्यातील नक्षलवादी आणि मागील १४ ते १५ वर्षांपासून फरार असलेला आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ “लॅपटॉप” याला दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटने अटक केली. कांबळेला पिंपरी चिंचवड परिसरातील चऱ्होली येथून ताब्यात घेतले.
कांबळे यांच्यावर २०११ साली ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो फरार होता. दरम्यानच्या काळात त्याने जवळपास ६ ते ७ वर्ष रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे स्थानिक आदिवासी पाड्यांमधील मुलांना शिकविण्याचे काम केले. आपले खरे अस्तित्व लपवून तो वावरत होता. त्याला न्यायालयाने फरार घोषित केले होते.
त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट आणि जाहीरनामा देखील जारी करण्यात आला होते. दरम्यान, दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटने ३ मे रोजी सापळा रचून चऱ्होली भागातून त्याला ताब्यात घेतले.
त्यानंतर त्याला मुंबई सेशन कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यास १३ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुणे युनिटच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.





