पिंपरी | मावळ तालुक्यातील अनेक गावांना भूस्खलनाचा धोका !

वडगाव मावळ, (वार्ताहर) : मावळ तालुक्यातील भाजे, पाटण, ताजे, बोरज, देवघर, वेहेरगाव, शिलाटणे, जेवरेवाडी, देवले, नेसावे, भुशी, माऊ कळकराई, तुंग, लोहगड, पाले (ना. मा.), मोरमारेवाडी, जांभवली, घोणशेत, साई व वाऊंड आदी गावांना भूस्खलनाचा धोका आहे. डोंगर पायथ्याशी वसलेली ही गावे पूनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत.
अनियंत्रित वृक्षतोड, अवैधरित्या होणारे उत्खनन, नैसर्गिक प्रवाहांचे दिशाबदल यांमुळे भूस्खलनाचा धोका अधिक वाढला असून प्रशासनाने यावर वेळीच उपाययोजना न केल्यास मावळातही तळई, माळीण सारखी मोठी दुर्घटना घडू शकते.
ही ८ गावे संवेदनशील –
माळीण दुर्घटनेनंतर जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि जी.एस.दी.ए या संस्थानी धोकादायक गावांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून मावळातील भुशी, माऊ, ताजे, बोरज, कळकराई, मालेवाडी, तुंग, लोहगड या ८ गावांना भूस्खलनाचा धोका असून त्यांचे पुनर्वसन करण्याचे सुचविले होते.
त्यावेळी या ८ गावांचा पुनर्वसनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजूरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविला आणि त्यास मंजूरी देखील मिळाली होती. या गावांचे लवकरच पुनर्वसन करण्यात येणार असे सांगण्यात आले, मात्र अद्याप एकाही गावाचे पुनर्वसन झालेले नाही.
तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेली अनेक लहान मोठी गावे आणि वाड्यावस्त्या आहेत. निसर्गाच्या सानिध्यात अनेक वर्षांपासून गुण्या गोविंदाने नांदत असलेल्या या गावांना आता भूस्खलनाची नजर लागली आहे.
बेसुमार वृक्षतोड, मोठ्या प्रमाणावर होणारी मुरूम आणि मातीची चोरी तसेच धनदांडग्यांनी टोलेजंग बंगले बांधण्यासाठी केलेले उत्खनन अन् नैसर्गिक प्रवाहांसोबतची छेडछाड यामुळे सह्याद्रीचा समतोल ढासळू लागलाय. त्याचा फटका आता स्थानिक गाववाल्यांना बसत आहे.
मोठी दुर्घटना झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?
मावळात वरील ८ गावांवर भूस्खलनाच्या धोक्याची टांगती तलवार आहे. मागील पावाळ्यात तुंग येथील भूस्खलनात एक घर जमीनदोस्त झाले होते.
कार्ला येथील एकवीरा मंदिराजवळ दरड कोसळली होती. तर काही वर्षांपुर्वी नेसावे गावावरील डोंगराला सुमारे दोन फुट रुंद लांबलचक खोल चर पडून हा भाग मुख्य डोंगरापासून वेगळा झालाय. पाले (ना. मा.) येथे दोन वर्षांपुर्वी वीज पडून चीर पडली होती.
या घटनांनंतर प्रशासनाने ग्रामसभा घेऊन पुनर्वसनाबाबत चर्चा घडवली. परंतू प्रत्यक्षात एखादी मोठी दुर्दैवी दुर्घटना झाल्यावरच उपाययोजना होणार का ? असा सवाल जीव मुठीत घेऊन जगणारे ग्रामस्थ विचारत आहेत.
भूस्खलन होण्याची कारणे –
मावळात अवैध उत्खनन, वेगवेगळ्या प्रकल्पासाठी झालेले भूसंपादन, बेसुमार वृक्षतोड, धनिकांनी बांधकामासाठी केलेला निसर्गाचा ऱ्हास, या ना अनेक कारणांनी नैसर्गिक प्रवाहांची बदललेली दिशा आदी घटक भूस्खलनासाठी कारण ठरत आहेत.
विशेषत: डोंगरभागातील गावांमध्ये हे बदल दिसत आहेत. त्यामुळे डोंगर, दऱ्यात वसलेल्या गावांचे लवकर पुनर्वसन करणे ही काळाची गरज आहे.
कधीही न विसरता येणारी ‘ती’ काळरात्र –
मावळ तालुक्यात जुलै १९८९ साली मोठी दुर्घटना घडली होती. साखर झोपेत असलेल्या भाजे गावावर डोंगराची दरड कोसळली आणि संपूर्ण गाव साखर झोपेत असतानाच गाडले गेले. त्यावेळी दुर्घटनेत सुमारे ४९ लोकांना जीव गमवावा लागला होता. त्या काळरात्रीच्या कटू आठवणी आजही मावळकर विसरले नाहीत.
गणेश तळेकर, निवासी नायब तहसीलदार, मावळ
“मावळ तालुक्यात भूस्खलनाचा धोका असलेल्या १९ गावांपैकी बोरज, कळकराई (सावळा), भुशी, माऊ, तुंग, मालेवाडी, ताजे आणि लोहगड ही ८ गावे संवेदनशील आहेत. सदर गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने उपाययोजना केल्या आहेत.
तसेच तहसील कार्यालयात मदतीसाठी २४x७ नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. तालुक्यात ७ ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे बसवण्यात आली आहेत.
प्रत्येक गावाचा गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा बनवण्यात आला असून तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखडाही तयार आहे.
यासह दि. ११ जून रोजी बैठक घेऊन सर्व विभाग प्रमुखांना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सूचना दिल्या असून ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन बैठका घेण्याच्याही सूचना दिल्या आहेत.”





