Fraud In Britain : ऋषी सुनक यांचा झटका..! 4 हजार भारतीय परिचारिकांना सोडावे लागणार ब्रिटन, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

Fraud In Britain :- मोठी रक्कम घेऊन व्हिसा स्पॉन्सर करणाऱ्या अनेक कंपन्या बोगस असल्याचे सिध्द झाले आहे. मात्र या प्रकारामुळे ब्रिटनमध्ये असलेल्या हजारो भारतीय परिचारिका संकटात सापडल्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून ज्या परिचारिकांना अर्थात नर्सना ठेवण्यात आले होते त्यांच्या विरोधात ऋषी सुनक यांच्या सरकारने आता कारवाई सुरू केली आहे.
ब्रिटन सरकारच्या या निर्णयाचा ७ हजारपेक्षा जास्त नर्सवर प्रभाव पडणार आहे. त्यातील तब्बल ४ हजार नर्स भारतीय आहेत. बोगस कंपन्यांमुळे ही समस्या निर्माण झाली असल्यामुळे सुनक सरकारही त्याकरता दोषी आहे असे मानले जाते आहे. सुनक यांच्या सरकारनेच कोणतीही पडताळणी न करता परदेशातून आलेल्या नर्सना कामावर ठेवण्याची परवानगी दिली होती. ब्रिटनमध्ये विदेशी नागरिकांना कामावर ठेवण्यासाठी स्पॉन्सर लायसन्सची आवश्यकता असते. तथापि, कोणतीही पडताळणी न करता शेकडो कंपन्यांना सुनक यांच्या सरकारकडून हे लायसन्स देण्यात आल्याचा आरोप आता होतो आहे. यातील अनेक कंपन्या बोगस असल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, भारतातील ज्या लोकांनी कर्ज काढून ब्रिटन गाठले आणि तेथे काम सुरू केले त्यांना भारतात परत जावे लागण्याची भिती सतावते आहे. महाराष्ट्रातील जैनब (वय २२) ही दोन मुलांची आई आहे. तिने आणि तिच्या भावाने इस्माइलने (वय २५) व्हिसा स्पॉन्सर करण्यासाठी ब्रिटनच्या कंपनीला १८ लाख रूपये दिले होते. मात्र ही कंपनी बोगस आहे आणि त्यांनी अगोदरही असेच घोटाळे केले आहेत हे या दोघांना तेथे गेल्यावर समजले.
आता तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना ६० दिवसांत स्पॉन्सर अथवा दुसरी कंपनी शोधण्यास सांगितले आहे. अन्यथा त्यांना ब्रिटन सोडावे लागणार आहे. अशी अनेक प्रकरणे आहेत. कोणी ब्रिटनला जाण्यासाठी भारतातील नोकरी सोडली आहे तर कोणी येथे चालणारा भारतातील व्यवसाय गुंडाळून ब्रिटन गाठले आहे. या सगळ्यांवर आता तो देश सोडावा लागण्याची टांगती तलवार आहे.





