आता मानवी मृतदेहापासून होणार खत निर्मिती

न्यूयॉर्कच्या गव्हर्नरने दिली ह्युमन कंपोस्टिंग प्रक्रियेला मान्यता
न्यूयॉर्क : झाडे फळे फुले किंवा इतर वनस्पतींपासून किंवा सूक्ष्मजीव कीटकांपासून खताची निर्मिती करणे आता वेगळी गोष्ट राहिली नसली तरी आता मानवी मृतदेहापासून सुद्धा खताची निर्मिती करण्यात येणार आहे. न्यूयॉर्कच्या गव्हर्नरने नुकतेच ह्युमन कंपोस्टिंग प्रक्रियेला मान्यता दिली असून लवकरच हा निर्णय अमलात येणार असून मानवी मृतदेहापासून खताचे उत्पादन केले जाणार आहे.
आता एखादी व्यक्ती मरण पावल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत. म्हणजेच दहनविधी किंवा दफनविधी केले जाणार नाहीत तर मृतदेहाचे कंपोस्टिंग करून त्याचे खतामध्ये रूपांतर केले जाणार आहे. ज्या मृतदेहाचे कंपोस्टिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यापासून निर्माण झालेले खत कुटुंबीय आपल्या घराच्या बागेसाठी वापरू शकतात किंवा त्यांची इच्छा असल्यास ते खत ते इतर लोकांना दान करू शकतात.
मृतदेहाचे खत सदृश मातीमध्ये रूपांतर करण्याच्या या प्रक्रियेला ह्यूमन कंपोस्टिंग असे म्हटले जात आहे. त्यामध्ये मृतदेहाला एका स्टीलच्या सिलेंडरमध्ये ठेवले जाते त्या मृतदेह सोबत काही रसायने ठेवली जातात. रासायनिक प्रक्रियेमुळे महिन्याभरातच त्या मृतदेहाचे मातीमध्ये रूपांतर होते आणि त्या मातीचा वापर खतासाठी केला जाऊ शकतो.
ह्यूमन कंपोस्टिंगला परवानगी देणारे न्यूयॉर्क हे सहावे राज्य आहे. 2019 मध्ये वॉशिंग्टनने सर्वात प्रथम ह्यूमन कंपोस्टिंग प्रक्रियेला परवानगी दिली होती. हे काम सोपवलेल्या रिकॉम्पोज या कंपनीने दिलेल्या माहितीप्रमाणे, एका मृतदेहापासून साधारण 36 पोती खताची निर्मिती केली जाऊ शकते कुटुंबियांना हे खत सुपूर्द करण्यापूर्वी त्याची काळजीपूर्वक तपासणी केली जाते आणि त्या मातीमध्ये किंवा खतामध्ये हानिकारक द्रव्य नाहीत ना हे काळजीपूर्वक तपासले जाते नंतरच ते खत कुटुंबियांना दिले जाते.
ज्या व्यक्तींना टीबी सारखा आजार आहे त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे किंवा मृत्यूपूर्वी त्यांच्यावर रेडिएशन थेरपी केली आहे. अशा व्यक्तींना मात्र ह्युमन कंपोस्टिंगची परवानगी दिली जात नाही पण दफनविधी किंवा दहनविधी करण्यासाठी जो खर्च येतो त्याच्या तुलनेत ह्यूमन कंपोस्टिंग साठी नाममात्र खर्च येतो असा दावाही करण्यात येत आहे. तसेच अमेरिकेतील अंत्यसंस्कार बहुतांशी दफन विधीचे असल्याने ही पद्धत जर प्रचलित झाली तर जागेची पण अडचण दूर होणार आहे.





