मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा टोलविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर भूमिका मांडली. राज्यातील प्रत्येक टोलनाक्यावर मनसैनिक उभा राहणार नाही तर टोलनाके जाळून टाकण्याचा थेट इशाराच शिंदे-फडणवीस सरकारला राज ठाकरे यांनी दिला आहे. यानंतर आता मनसैनिक आक्रमक झाले असून मैदानात उतारल्याचे पाहायला मिळाले आहे. मनसेचे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी मुंबईतील मुलुंड टोलनाक्यावर धाव घेत आंदोलन सुरु केले आहे. अविनाश जाधव यांनी लहान वाहनांना विना टोल सोडण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अविनाश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अविनाश जाधव यांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु चुकीच्या पद्धतीने टोल वसूल केला जात असल्याचे अविनाश जाधव पोलिसांना सांगत असल्याचे दिसले. दुसरीकडे, मनसैनिकांनी जुन्या मुंबई-पुणे हायवेवर असलेल्या शेडूंग टोल नाका (Shedung Toll) येथे आंदोलन सुरु केले आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य ठाकरे (Raj Thackeray) यांनी, “गेल्या चार दिवसांपासून अविनाश जाधव आणि इतर सहकारी ठाण्यात ५ ठिकाणी झालेल्या टोलवाढीच्या विरोधात उपोषणाला बसले होते. मला राज्य सराकरकडून एक पत्र आलंय. त्यात सगळ्या गोष्टी नमूद केल्या होत्या. कुणाकुणाला टोल नाहीये, कुणाला टोल आहे असं त्यात लिहिलं होतं. टोलचा सगळा पैसा कॅशमध्ये आहे. हा पैसा जातो कुठे? याचं होतं काय? त्याच त्याच कंपन्यांना हे टोल मिळतात कसे? त्यानंतरही रस्त्यांवर खड्डे पडणार असतील तर हा पैसा जातो कुठे? आपण रोड टॅक्स भरतो, तो कुठे जातो? हे कुणालाही कळत नाही. अत्यंत घाणेरड्या परिस्थितीतले रस्ते आपल्या वाट्याला येतात”, असे काही सवाल करत राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यांचं काय उत्तर येतंय बघू. नाहीतर आत्ता उपमुख्यमंत्र्यांनी सांगिलंय की चारचाकी, दुचाकींना टोल नाही. मग आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभं राहून चारचाकींना टोल भरू देणार नाही. याला जर त्यांनी विरोध केला, तर आम्ही हे सगळे टोलनाके जाळून टाकू. पुढे महाराष्ट्र सरकारला काय करायचंय ते सरकारनं करावं”, अशी रोखठोक भूमिका यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतली. काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस? राज्यातील सर्व टोलवर छोट्या गाड्यांना आम्ही मुक्ती दिली आहे. केवळ व्यावसायिक वाहनांकडूनच आम्ही टोल घेतो. त्याचे पैसे राज्य सरकारने दिलेले आहेत, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते.