वाघोली, (प्रतिनिधी) – दहावीच्या परीक्षेच्या एक दिवस अगोदर फी वसुलीसाठी हॉल तिकीट देण्यास नकार दिल्याने प्रॉडीजी पब्लिक स्कूलमध्ये मनसैनिकांनी केलेल्या तोडफोडीनंतर दबावाखाली पोलीस निरीक्षकांनी अधिकची कलमे लावून लोणीकंद पोलीस स्टेशन येथे दाखल केलेला गुन्हा तसेच अटकेनंतर सूडबुद्धीने वागत दिलेल्या त्रासाची लेखी तक्रार वाघोलीचे मनसैनिक प्रकाश जमधडे यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त व पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण यांच्याकडे केली आहे. त्याचप्रमाणे गृह विभाग मंत्री, सचिव, लाचलुचपत विभाग यांच्याकडे देखील मेलद्वारे तक्रार केली आहे. जेएसपीएम शैक्षणिक संकुलातील प्रॉडीजी पब्लिक स्कूल प्रशासनाने परीक्षेच्या एक दिवस अगोदर फी वसुलीसाठी 10 वीच्या परीक्षेचे हॉल तिकीट देण्यास नकार दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाघोलीतील पदाधिकार्यांकडून जेएसपीएम शैक्षणिक संकुलातील प्रॉडीजी पब्लिक स्कूलमध्ये करण्यात आलेल्या तोडफोडीप्रकरणी मनसैनिकांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक देखील झाली होती. मनसैनिकांनी देखील स्कूलविरोधात गुन्हा दाखल करण्याचे लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. हा तक्रार अर्ज पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी शिक्षण विभागासह सीबीएसई बोर्डाकडे पाठविला होता. मनसैनिकांना जामीन मंजूर झाला असला तरी अटकेदरम्यान लोणीकंद पोलीस स्टेशन विशेषतः पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी सूडबुद्धीने वागत त्रास देण्याचा प्रयत्न केला. तोडफोडी व्यतिरिक्त समूहाने केलेल्या गुन्ह्यांची नोंद केली, कोठडीत पुरेसे पाणी, जेवण सुविधा दिली गेली नाही. कोठडी जास्त राहावी म्हणून न्यायालयात राहिले नाहीत, जप्त मोबाईल दिला नाही आदी बाबींची विस्तृत तक्रार प्रकाश जमधडे यांनी अर्जात केली आहे. गुन्ह्यासाठी योग्य ती कलमे लावून अतिरिक्त कलमे हटविण्यात यावीत तसेच तपास अधिकारी बदलून मिळावे, पोलीस निरीक्षक ढाकणे यांची बदली करण्यात यावी, मोबाईल परत मिळावा अशी मागणी जमधडे यांनी तक्रार अर्जात केली आहे. आरोपांचे खंडण प्रकाश जमधडे यांच्यावर गुन्हा दाखल असल्याने त्यांनी आरोप केले आहेत. गुन्ह्यातील सर्व पुरावे आहेत. लवकरच चार्जशीट कोर्टात पाठविण्यात येईल, असे म्हणत पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी केलेल्या आरोपांचे खंडण केले आहे.