मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरु

जालना – संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज जालना येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील सहभाग घेतला. यावेळी मनोज जरांगे यांनी व्यासपीठावर न जाता आंदोलकांमध्ये बसने पसंद केले. त्यानंतर आता त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
जालना येथील मोर्चात सहभागी झाल्यानंतर मनोज जरांगे यांना अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सध्या डॉक्टर त्यांची तपासणी करत असून त्यांना सलाईन लावण्यात आला आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, देशमुख यांच्या मारेकर्यांना कठोरात कठोर कारवाई व्हावी, आदी मागण्या जोर धरत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी निषेध मोर्चे काढले जात आहेत.
वैभवी देशमुखला अश्रू अनावर –
या मोर्चात बोलताना संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख हिला अश्रू अनावर झाले. तिने आपल्या मोडक्या तोडक्या शब्दांत पप्पा आम्हाला माफ करा, आम्ही तु्म्हाला वाचवू शकलो नाही, अशी भावना व्यक्त केली. तिचे हे शब्द ऐकून उपस्थितांना गहिवरून आले होते.
वैभवी देशमुख म्हणाली की, आज आमचा आनंद आमच्यापासून हिरावून घेण्यात आला. पण इथे जमलेल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही उभे राहू शकलो. तुमच्यामुळेच आम्हाला हा न्यायाचा लढा पुढे नेता येत आहे. आपल्याला न्याय मिळवायचा आहे. त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने एकत्र येऊन आमच्या कुटुंबीयांच्या पाठीमागे उभे राहिलात. यापुढेही तुम्ही आमच्यामागे असेच उभे राहा.
वडिलांना झालेल्या वेदनांचे हवे आहे उत्तर
तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप मोठे सहकार्य केले. आम्ही ज्यावेळी रस्त्याने चालतो त्यावेळी आम्हाला धक्काबुक्की होऊ नये म्हणून तुम्ही लोकांना हातजोडून विनंती केली की, आम्हाला चालू द्या. त्यासाठी मी तुमचे आभार मानते. माझ्या वडिलांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. माझा आरोपींना एक प्रश्न आहे की, तुम्ही माझ्या वडिलांना एवढा छळ करून का मारले? त्यांना त्यावेळी किती वेदना झाल्या असतील? मला याचे उत्तर हवे आहे. हे बोलताना वैभवीचा कंठ दाटून आला होता.
ती पुढे म्हणाली, मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की, मी देशमुख कुटुंबातील मुलगी आहे. माझ्या आई-वडिलांची मी लेक आहे. पप्पा तुम्ही आज जिथे कुठे असाल तिथे हसत राहा. आम्हाला माफ करा की, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही, हे म्हणताना वैभवीला आपला हुंदका आवरता आला नाही. तिचा हुंदका मोर्चात उपस्थित सर्वांनाच अस्वस्थ करून गेला.
खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडला अटक
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी 7 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी 6 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. कृष्णा आंधळे नामक एक आरोपी अजूनही फरार आहे. त्याचा कसून शोध घेतला जात आहे. सीआयडीने या प्रकरणाशी निगडित असणाऱ्या खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड याला बेड्या ठोकल्या आहेत. वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू आहे. त्यामुळे या प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे.



