Manoj Jarange : तुमच्या ताकदीवर जिंकलो..! विजय होताच मनोज जरांगेचे पहिले उद्गार, मुंबईत पाटील.. पाटील.. घोषणांनी दणदणाट!

मुंबई : मराठा आरक्षणाच्या लढ्याला आज ऐतिहासिक यश मिळाले असून, आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने सरकारला झुकवले आहे. “जिंकलो हो राजे! तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो!” असे भावनिक उद्गार जरांगे यांनी काढले, आणि “एक मराठा, लाख मराठा!”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय!”, “गणपती बाप्पा मोरया!” तसेच “पाटील-पाटील”च्या घोषणांनी आझाद मैदान आणि परिसर दणाणून गेला.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या या तीव्र उपोषणाला अखेर मोठा विजय मिळाला आहे. मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माणिकराव कोकाटे यांनी जरांगे यांची भेट घेऊन मागण्या मान्य केल्या असून, हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह, मराठा-कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय दोन महिन्यांत घेण्यासाठी सरकारला मुदत देण्यात आली आहे.
मनोज जरांगेंचे भावनिक उद्गार
आंदोलनाला यश मिळाल्याची घोषणा करताना जरांगे यांनी उपस्थित मराठा बांधवांना उद्देशून सांगितले, “एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जीआर दिला, तर रात्री ९ वाजता मुंबई खाली होईल. नाचत-नाचत पोरं गावाकडे जातील. तुम्ही थांबा म्हटलं तरी थांबणार नाहीत! तुम्ही जीआर द्या, आम्ही तुमच्या स्वागताला तयार आहोत. आज कळलं, गरीबांची ताकद किती मोठी आहे!” या शब्दांनी उपस्थितांचा उत्साह द्विगुणित झाला. जरांगे यांनी सरकारला आव्हान देताना म्हटले, “जीआर घेऊन या, इथेच बसा, आम्ही तुमचं स्वागत करू!” या विजयाने मराठा समाजात आनंदाची लाट उसळली आहे.
मराठा-कुणबी एकतेचा निर्णय आणि सरकारचे आश्वासन
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही जरांगे यांची प्रमुख मागणी होती. यासह, मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा त्यांनी सातत्याने मांडला. यावर सरकारने स्पष्ट भूमिका घेतली असून, मराठा-कुणबी एकतेच्या मुद्द्यावर शासन निर्णय घेण्यासाठी दोन महिन्यांची मुदत मागितली आहे. जरांगे यांनीही ही वेळ देत सरकारला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. यामुळे आता पुढील दोन महिन्यांत मराठा-कुणबी एकतेच्या मागणीवर ठोस निर्णय अपेक्षित आहे.
मनोज जरांगे यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य
– हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करण्या यावी अशी मनोज जरांगे यांची मागणी होती. या शासनाने मान्यता दिली आहे.
– गावातील कुळातील नात्यातील व्यक्तींना चौकशी करुन कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
– सातारा गॅझेटवर अभ्यास करून त्याला जलद मान्यता देण्यात येईल.
– मराठा आदोलकांवरील या आधीचे गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेण्यात येणार. काही ठिकाणचे गुन्हे मागे घेतले. काही गुन्हे कोर्टात आहेत. कोर्टात जाऊन मागे घेऊ ते म्हणाले. सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व केसेस मागे घेऊ असं ते म्हणाले.
– कुटुंबीयांच्या वारसांना १५ कोटी मदत यापूर्वी दिली आहे. उर्वरीत कुटुंबीयांना एका आठवड्याच्या आत आर्थिक मदत खात्यावर येईल. नोकरी राज्य परिवहन मंडळात नोकरी देऊ असं सरकार म्हणालं.





